आणखी बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार ; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

0
484

नागपूर, दि. ३ (पीसीबी) –  भाजप प्रवेशांना ‘महाभरती’ असे म्हणणार नाही. परंतु आता आम्ही हाऊसफुलचा बोर्ड लावला आहे. तरी काही अति महत्त्वाच्या व्यक्तींना त्यांची पार्श्वभूमी तपासून, तसेच त्यांचे काम आणि लोकप्रियता पाहून भाजपमध्ये प्रवेश देऊ शकतो. येत्या काही दिवसांमध्ये अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.  

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांना जनता का नाकारत आहे, याचा विचार त्यांनी केला पाहिजे.  लोक आमच्याकडे येत आहेत, त्यांचा आमच्यावर विश्वास आहे.  गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात झालेला विकास हा जनतेला दिसत आहे. तसेच आम्ही जनतेला उत्तम सरकार देण्याचा प्रयत्न करत  आहे,  असेही ते म्हणाले.

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले होते. त्यावेळी भाजपने 144 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी १२२ जागांवर विजय मिळाला होता. आता आम्ही अर्ध्या अर्ध्या जागा लढवणार असून काही जागा मित्रपक्षांसाठीही सोडणार आहोत. यावेळी किती जागांवर विजय मिळेल याचा आकडा सांगता येणार नसला तरी तो नक्कीच विक्रमी असेल आणि याचा आम्हाला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.