आढळराव कुठूनही उभे रहा, निष्ठावंंत तुम्हाला पाडतील..

0
229

मंचर, दि. २२ (पीसीबी) – ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेबरोबर गद्दारी करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोठूनही निवडणूक लढवावी, त्यांना निष्ठावंत शिवसैनिक पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. शिवसैनिकांनी आजपासूनच पक्ष संघटना मजबुतीसाठी कामाला लागावे,’ असे आवाहन शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत मिर्लेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते व आमदार सचिन अहीर हे होते. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, माजी जिल्हाप्रमुख ॲड. अविनाश राहणे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजाराम बाणखेले, गणेश कवडे, बाळासाहेब वाघ, कल्याण हिंगे, अजित चव्हाण, बाळासाहेब पवळे, बबनराव गव्हाणे, कलावती पोटकुले आदी उपस्थित होते.

मिर्लेकर म्हणाले, ‘शिवसेना पूर्वी अधिक ताकदवान होती. पण, सन २००४ मध्ये आढळराव हे शिवसेनेत आले. त्यांना तीन वेळा खासदार केले. त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत सतत भांडणे लावण्याचे काम केले. त्यांच्या जाण्यामुळे काहीच फरक पडणार नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिक जागेवरच आहेत. फक्त आढळराव सेना निघून गेली आहे. आढळराव पाटील हे खासदार झाल्यापासून उतरती कळा लागली. त्यांनी फक्त आढळराव सेना वाढविण्याचे काम केले. ते अलिबाबा ४० चोरांच्या टोळीत सहभागी झाले. यापुढे शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांना साथ देण्याचे काम करावे.’
अहीर म्हणाले, ‘आढळराव पाटील हे पक्षनिष्ठेबद्दल वारंवार सांगत होते. पण, ज्याप्रमाणे भारतातून ईस्ट कंपनी गेली, त्याप्रमाणे आढळराव गेले. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना स्ट्रॉंग होईल. आढळराव यांनी चिंतन बैठक बोलावली, असं समजतं; पण ती चिंता वाढवणारीच ठरेल.’
शिरूर लोकसभा मतदारसंघात आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार आहे. शिवसेनेने ज्यांना मोठे केलं, त्यांनीच भाजपच्या पदराआड लपून शिवसेने विरोधात कट कारस्थान केले आहे. भाजपचा पदर बाजूला काढा व मैदानात या, तुम्हाला शिवसैनिक घरचा रस्ता दाखवतील, असे आमदार सचिन आहिर म्हणाले.