आघाडीत मोठा भाऊ कोण? काँग्रेस-राष्ट्रवादीत चुरस

0
437

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळतील, याचे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात तुलनेने उत्साहाचे वातावरण असताना काँग्रेसमध्ये मात्र शंकेची पाल चुकचुकत आहे. भाजप आणि शिवसेनेत भाजप हाच मोठा भाऊ असेल असे भाजपने अधोरेखित केले आहे. औसा आणि मुंबईतील संयुक्त जाहीर सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आपले छोटे बंधू, असा उल्लेख केला होता. यावरून भाजप हाच मोठा भाऊ असल्याचा संदेश मोदी यांनी दिला होता. आता काँग्रेस-राष्ट्रवादीत मोठा भाऊ कोण असेल, याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीने यावेळी चांगला जोर लावला होता. प्रचारात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जातीने लक्ष घातले. राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात असलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये त्यांनी प्रचारसभा घेतल्या. पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीला कधीच खासदारांचा दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. या वेळी कोणत्याही परिस्थितीत दुहेरी आकडा गाठायचाच या निर्धाराने पक्ष उतरला होता. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ात राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना वाटतो.

राष्ट्रवादीला राज्यात सर्वत्र चांगला पाठिंबा मिळाल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत जास्त रस आहे. यामुळेच लोकसभेचे मतदान पार पडताच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला. शनिवारी, ४ मे रोजी पक्षाच्या नेत्यांची बैठक पवार यांनी बोलाविली आहे. लोकसभेत काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि विधानसभा निवडणुकीत आघाडी कायम राहिली तर जास्त जागा मिळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल. २०१४ मध्ये मोदी लाटेत राज्यात आघाडीचा पार धुव्वा उडाला होता. तेव्हा राष्ट्रवादीचे चार, तर काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले होते.

या वेळी काँग्रेसचा प्रचार भरकटला होता. राज्यात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सहा सभा झाल्या, पण मुंबईत ते फिरकले नाहीत. काँग्रेसला १९९९पासून मुंबईने चांगली साथ दिली होती. यावेळी मुंबईत काँग्रेसला फार काही यशाची अपेक्षा दिसत नाही. राष्ट्रवादीला काही जागा मिळतील, याची खात्री त्या पक्षाला देता येते. परंतु काँग्रेसला एखाद-दुसऱ्या जागेचा अपवाद वगळल्यास यशाची खात्री देता येत नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण  नांदेडमध्येच प्रचारात अडकले होते. राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या समोर गुलबर्गा मतदारसंघात भाजपने यंदा आव्हान उभे केल्याने आतापर्यंत दहा निवडणुका जिंकणारे खरगेही आपल्याच मतदारसंघात अडकून पडले. पक्षाच्या उमेदवारांकडे साधनसामग्रीचाही अभाव होता.