अहो, हे विमान आहे की वडाप…..

0
1003

काबुल, दि. १७ (पीसीबी) : अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर भविष्यातील अराजकता लक्षात घेता तिथले नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अफगाणिस्तानमधील भीषणता दाखवणारा एका फोटो सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या 134 सीटर विमानात तब्बल 800 लोकांनी प्रवेश केल्याचं आणि तिथेच ठिय्या मांडल्याचं या फोटोतून दिसतंय.

अमेरिकेतील डिफेन्स वन या वेबसाईटने हा फोटो अपलोड केला आहे. अमेरिकेच्या वायूदलाचे सी-17 ग्लोबमास्टर (C-17 Globemaster) हे विमान अमेरिकन नागरिकांची सुटका करण्यासाठी काबुलला गेलं होतं. या विमानातील प्रवासी संख्या ही 134 इतकी आहे. पण जसं या विमानाचे दार उघडले तसं विमानतळावर असलेल्या अफगाणी नागरिकांनी यामध्ये प्रवेश केला. जवळपास 800 लोकांनी या विमानात प्रवेश केला.
तुम्ही घेऊन जाल तिकडे येतो पण उठणार नाही.

विमानात प्रवेश केलेल्यांपैकी 640 लोक हे अफगाणी नागरिक आहेत. अमेरिकन सैन्याने त्यांना वारंवार बाहेर जायला सांगितले तरीही ते ऐकत नव्हते. त्यांनी विमानातच मिळेल त्या ठिकाणी ठिय्या मांडला. अफगाणिस्तानमध्ये राहिलो तर आपल्याला ठार मारलं जाईल असं सांगत तुम्ही घेऊन जाल तिकडे येतो पण उठणार नाही अशी भूमिका या नागरिकांनी घेतली.

शेवटी या विमानातील क्रुचा नाईलाज झाला. त्यांनी या विमानातील सर्व सीट्स काढून टाकल्या. त्यानंतर सर्व लोकांनी खालीच ठिय्या मांडला. या 800 लोकांसहित विमानाचे उड्डाण करण्याचा धाडसी निर्णय वैमानिकांनी घेतला. इतक्या मोठ्या प्रवाशांसोबत उड्डाण करण्याचा हा एक विक्रमच असल्याचं सांगितलं जातंय.