अष्टपैलू माजी खेळाडू पै. बबनराव विठोबा म्हस्के यांचं निधन

0
284

भोसरी,दि.०८(पीसीबी) – भोसरी (ता. हवेली) येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतील निवृत्त कर्मचारी, भैरवनाथ कबड्डी संघातील अष्टपैलू माजी खेळाडू तथा भगवा ग्रुपचे आधारस्तंभ पै. बबनराव (आप्पा) विठोबा म्हस्के (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्यापाठीमागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सून, जावई, नातवंडे, नातेवाईक असा परिवार आहे.

खेड तालुक्यातील बहुळ हे गाव जन्मभूमी असलेले वस्ताद पै. बबनराव (आप्पा) म्हस्के भोसरी शहरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. आपल्या तारुण्यात त्यांनी शहरात प्रसिद्ध असलेल्या भैरवनाथ कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करताना आपल्यातील उत्कृष्ट खेळाची चुणूक दाखवली. कबड्डी पाठोपाठ कुस्ती क्षेत्राचीही आप्पांना फार आवड होती. कुस्तीची मैदाने म्हंटलं की, आप्पांची उपस्थित ठरलेली असायची. जन्मभूमी असलेल्या बहुळ गावात यात्रेनिमित्त आयोजित कुस्तीच्या आखाड्यात आप्पा नेहमी सक्रिय सहभाग घेत असे. विशेष म्हणजे पैलवान मंडळींच्या खेळाला चालना देण्यासाठी वैयक्तिक रोख पारितोषिकसह विविध पदके आप्पांकडून दिली जात होती.

भोसरी गावातील भगवा ग्रुपचे आधारस्तंभ असलेल्या आप्पांचे आजच्या तरुणांसोबत मित्रत्वाचे नाते उल्लेखनीय ठरले. गावासह भोसरी शहरातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात आप्पांचे योगदान संस्मरणीय ठरले आहे. नामांकित असलेल्या ऑर्डनन्स कंपनीत ३५ वर्ष आप्पांनी सेवा केली. आप्पांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. भोसरी येथील छावा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गणेश म्हस्के व भगवा ग्रुपचे संस्थापक – अध्यक्ष पै. योगेश म्हस्के तसेच वडगाव – घेनंद (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या योगिता शाम बवले यांचे ते वडील होते.