अयोध्या नको, कर्जमाफी हवी! संसदेवर आज शेतकरी मोर्चा

0
496

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – अयोध्य नको, कर्जमाफी हवी आहे, अशी घोषणाबाजी करीत देशभरातून हजारो शेतकरी गुरुवारी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर दाखल झाले. डोक्यावर लाल टोपी आणि हाती लाल झेंडा घेतलेले शेतकरी बांधव ३६ तासांची पदयात्रा करून राजधानीत धडकले असून, ते आज शुक्रवारी संसदभवनावर मोर्चा नेणार आहेत.

सकाळी दहावाजेपासूनच रामलीला मैदान भरण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत आंदोलक शेतकरी जमा होत होते. पंधरा हजाराहून अधिक आंदोलक मैदानात दाखल झाले असून, हजारो जण अद्यापही दिल्लीच्या दिशेने कूच करीत असल्याचा दावा ऑल इंडिया किसान सभेने केला आहे. दिल्लीतील साहिब गुरुद्वारा, शीशगंज साहिब, रकाबगंज, बाप साहिब आणि मजनू टीला येथे शेतकऱ्यांची रात्रभर थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंद विहार रेल्वे स्टेशनवर तंबू लावले असून, पाणी तसेच अन्नाच्या पाकिटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आंदोलकांचे नेते अतुल अंजान यांनी दिली आहे. आंदोलक संसदेकडे कूच करीत असताना कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार असून, रस्त्याच्या दुतर्फा दोर लावला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.