अम्मा एएफसीचा सहज विजय

0
333

मुंबई, दि.०२ (पीसीबी) : वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या (डब्लूआयएफए) महिला फुटबॉल लीगमध्ये नागपूरच्या अम्मा एफसी संघाने शानदार विजयी सुरवात केली. त्यांनी उदघाटनाच्या सामन्यात अननुभवी नेक्स्ट स्पोर्ट्स अकादमी संघाचा ५-० असा धुव्वा उडवला.

या स्पर्धेला येथील कुपरेजच्या मैदानावर आजपासून सुरवात झाली. भारतीय फुटबॉल संघटनेच्या महिला लीगसाठी या स्पर्धेला पात्रता स्पर्धेचा दर्जा देण्यात आला आहे.

सामन्याच्या चौथ्या मिनिटाला निधी वर्मा हिने अम्मा संघाचे खाते उघडले. त्यानंतर त्यांचे सातत्याने आक्रमण राहिले. सामन्याच्या १७व्या मिनिटाला त्यांना दुसरा गोल नोंदविण्यात यश आले. पुनम कुमारी हिने हा गोल केला. त्यानंतर विश्रांतीला आघाडी ३-० अशी करताना ४१व्या मिनिटाला अॅनी अॅन्थोनी हिने गोल केला. उत्तरार्धात नेक्स्ट अकादमीचा खेळ उंचावला खरा, पण त्यांना अम्मा संघाला आणखी दोन गोल करण्यापासून रोखता आले नाही. दोन्ही गोल राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या निकिता शेंडे हिने अनुक्रमे ७९ आणि ८५व्या मिनिटाला केले.

आणखी एका सामन्यात मुंबईच्या केंक्रे एफसी संघाने हर्षिका जैन हिने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोावर इंडियन रश एफसी संघाचा ३-१ असा पराभव केला. हर्षिकाने सातव्या मिनिटाला खाते उघडले. त्यानंतर १४व्या मिनिटाला नबम कमित हिने दुसरा गोल केला. प्रतिस्पर्धी संघाच्या निर्मरा दुर्वे हिने २४व्या मिनिटाला गोल करून आघाडी कमी केली. पण, हर्षिताने ६६व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचा फायदा उठवताना आघाडी भक्कम केली .

क्रीडाक्षेत्राच्या घडामोडी आणि रंगणाऱ्या नाट्याची माहिती देणारे मराठीमधील एकमेव स्वतंत्र न्यूजपोर्टल. येथे आपल्याला वाचायला मिळणार खेळाविषयीच्या अनेक घडामोडी त्याच्या विविध अंगांसह.