अमेरिकेच्या मदतीने आयएसआय कडून दशतवाद्यांना प्रशिक्षण – इम्रान खान

0
523

इस्लामाबाद, दि. २४ (पीसीबी) –  पाकिस्तानने १९८० मध्ये अमेरिकेच्या मदतीने सोव्हिएत संघाविरोघात जिहाद पुकारला होता. अमेरिकेच्या मदतीनेच आयएसआयने जगभरातील मुस्लीम देशांमधून दहशतवाद्यांना बोलावून सोव्हिएत संघाविरोधात जिहाद पुकारण्यासाठी प्रशिक्षण दिले होते, अशी माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली.

अमेरिकेच्याच मदतीने आयएसआय कडून दशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे इम्रान खान म्हणाले. काऊंसिल ऑन फॉरेन रिलेशन्समध्ये बोलताना पुन्हा एकदा त्यांनी पाकिस्तानात दहशतवाद वाढीस लागण्यास अमेरिका कारणीभूत असल्याचे म्हटले. ज्यावेळी अमेरिकेच्या मदतीने पाकिस्तानने जिहाद पुकारला होता त्यानंतर अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रिगन यांनी आपल्याला वॉशिंग्टनमध्ये बोलावल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी तालिबानसोबत अचानक चर्चा थांबवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावरही भाष्य केले. “अफगाणिस्तानमधील समस्या ही लष्कराच्या कारवाईने सुटणार नाही. २००८ मध्ये ओमाबा प्रशासनालाही ही बाब मी सांगितली होती. परंतु त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही. परदेशी सैन्याविरोधात अफगाण कायम एकत्र येतात. आज पाकिस्तानातही हजारो अफगाणी निर्वासित आहेत. ट्रम्प सरकारने शांतता करार रद्द केल्याबद्दल आम्ही वृत्तपत्रातून वाचले आहे. ही एक मोठी चूक आहे आणि याबाबत ट्रम्प यांच्याशी चर्चा केली करू,” असे इम्रान यावेळी म्हणाले. “संपूर्ण अफगाणिस्तानवर आपण पुन्हा एकदा नियंत्रण मिळवू शकत नाही, तसेच अफगाणिस्तानच्या लष्करावरही ताबा मिळवू शकत नाही, हे आता तालिबानलाही माहित आहे. राजकीय समाधान हाच यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे, अन्यथा अमेरिकेच्या लष्कराला अफगाणिस्तानमधून बाहेर पडता येणार नाही,” असेही ते म्हणाले.