अमरावतीच्या खासदार- आमदारांना कोरोना उपचारासाठी नागपुरात का जावे लागते ?

0
290

थर्ड आय – अविनाश चिलेकर 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, त्यांचे पती आमदार रवि राणा आणि कुटुंबातील १२ सदस्यांना कोरोनाची बाधा झाली म्हणून उपचारासाठी नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे वृत्त आज वाचले. नांदेड शहरावर दोन पिढ्या (म्हणजे स्व.शंकरराव चव्हाणांपासून) सत्ता गाजविणारे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे राज्यातील सर्वेसर्वा आणि आघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनीही कोरोना झाला म्हणून उपचारासाठी मुंबई गाठली. राष्ट्रवादीमधील वजनदार नेते धनंजय मुंडे यांना कोरोना झाला तर उपचारासाठी मुंबईच योग्य वाटते. मुंबई, पुणे, नागपूर आणि खालोखाल नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर सारखी शहरे वैद्यकीय उपचारासाठी त्यातल्या त्यात बरी आहेत. देशाची आणि राज्याचीही ६०-७० टक्के जनता गावात राहते. त्यांच्यासाठी सुसज्ज रुग्णालये करू शकलो नाही ही शोकांतिका आहे. देशाला स्वातंत्र मिळाली त्याला ७० वर्षे लोटली. तीन पिढ्या गेल्या मात्र गावाकडच्या माणसाला जगण्याची शाश्वती देतील अशी हॉस्पिटल उभारता आली नाहीत, हे आपल्या तमाम पुढाऱ्यांचे खूप मोठे अपयश आहे. खरे तर, एक जात सगळ्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे.निवडणुकिसाठी १०-२० कोटी पाण्यासारखे खर्च करतील, पण लोकांसाठी हॉस्पिटल उभे करायचे म्हटले की सरकारकडे बोट दाखवतील. तीन महिन्यांत गावाकडे कोरोनाचे आणि मरणारांचे प्रमाण कमी होते आता वाढले आहे. केवळ वेळेत बेड मिळाला नाही, ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून प्राण सोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते खासगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करुन कसेही जगतात. राणा कुटुंबाला कोटी रुपये खर्च गेला तरी फरक पडणार नाही, पण गरिबाचे काय हा प्रश्न आहे. खरे तर, मंत्री, खासदार, आमदार या व्हिआयपी की अधिक स्पेशल लोकांना जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात जगण्या मरण्याच्या लढाईसाठी दाखल केले पाहिजे, म्हणजे एका एका जीवाचे मोल कळेल. आमच्या भावना, संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत की आम्हाला या परिस्थितीचा संतापही येत नाही. आमचा दगड झाला आहे दगड. जनता जोवर जाब विचारत नाही तोवर नवनीत राणा, रवि राणा यांच्यासारखे आणखी कितीही खासदार-आमदार आले गेले तरी फरक पडणार नाही. अमरावतीची हीच शोकांतिका साऱ्या महाराष्ट्राची आहे.

अमरावती विभागातील नेते, सत्ता काय कामाची …
अमरावती ही पश्चिम विदर्भाची राजधानी, पण आजही हॉस्पिटलसाठी नागपूरला जावे लागते याची नेते मंडळींना जराही लाज वाटत नाही. अमरावती, अकोला, बुलढाना, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांचा मिळून हा महसूल विभाग आहे. दुर्दैव असे की, एकाही जिल्ह्यात खासदार राणा यांच्यावर उपचार होतील असे हॉस्पिटल उपलब्ध नाही. मग सत्ता काय कामाची हा प्रश्न आहे. खासदार नवनीत राणा या प्रथमच निवडूण आल्याने त्यांना दोष देता येत नाही, पणण त्यांचे पती तीन-तीन टर्म आमदार आहेत. त्यांनी स्वतःची खासगी शाळा उभी केली पण त्यांनाही गोरगरिबांसाठी हॉस्पिटलला प्राधान्य द्यावे असे वाटले नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात अशी राणा यांची ख्याती आहे. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यातील ताईत अशी राणा यांची दुसरी ओळख, पण हे सारे काय कामाचे असा जनतेच्या मनातील सवाल आहे. विधान परिषदेचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनाही कोरोना झाला. उपचारासाठी त्यांनाही नागपूरलाच जायला लागले. अमरावती विभागातील आजवरच्या राजकीय सारिपाटावर कोणती नावे आहेत त्यावर सहज नजर टाकली. अमरावती विभागाचे नाव कोणत्या नेत्यांमुळे झाले ते पाहिले. महाराष्ट्राचे कर्तबगार दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक (यवतमाळ), शिकार टप्प्यात आली की बार टाकणारे दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक (वाशिम) प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील खुद्द अमरावतीच्या. त्याचे चिरंजीवही इथे आमदार होते. अमरावती हे आताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आजोबांचे (प्रबोधनकार) ठाकरेंचे मूळ गाव. भाजपचे निर्विवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामाचे गाव म्हणजेच आजूळ. जगदीश गुप्ता २२ वर्षे आमदार, मंत्री होते. आताच्या आघाडी सरकारमधील यशोमती ठाकूर किंवा चार वेळा आमदार झालेले राज्यमंत्री बच्चू कडू हे याच विभागाचे कारभारी आहेत. राज्यमंत्री कडू यांचे अपंगांसाठीचे कार्य निर्विवाद मोठेच आहे. प्रकाश भारसाखळे सहा टर्म आमदार होते, त्यांनाही हॉस्पिटल महत्वाचे वाटले नाही.

आमदार अनिल बोंडे राज्याचे कृषीमंत्री असून, स्वतः डॉक्टर असताना त्यांनीही त्या दिशेने कधी विचार करावा वाटले नाही. शिवसेनेचे जेष्ठ नेते आनंदराव अडसूळ हे दोन वेळा अमरावतीतून आणि दोन वेळा बुलढाण्यातून खासदार होते. ते केंद्रीय मंत्रीसुध्दा होते. आताचे केंद्रीय मंत्री संजय धोत्रे याच विभागाचे प्रतिनिधीत्व करतात. शिवसेनेच्या सलग पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यासुध्दा याच विभागातून पाच टर्म खासदार आहेत. गेले वीस वर्षांपासून जनतेने भाजप, शिवेसनेचे ४ -४ खासदार या मतदारसंघातून निवडूण दिले. युतीने काय परतफेड केली याचाही लेखाजोखा मांडण्याची वेळ आली आहे. भाजपचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर, संजय राठोड, काँग्रेसचे सुधाकरण गणगणे अशी वजनदार नेत्यांची कितीतरी मोठी जंत्री आहे. पण नाव मोठे लक्षण खोटे अशी परिस्थिती. नुसते मोठे घर पोकळ वासा, हे लोक गोरगरिबाच्या काय कामाचे. कोरोनाच्या संकटात प्रत्येकाच्या जगण्याशी निगडीत हा प्रश्न असल्याने लोकांनी तोंड उघडले पाहिजे. अन्यथा मुकी बिचारी कोणीही हाका असेच होईल.

शाळेसाठी जमीन घ्यायची आणि दुकान थाटायचे हा नेत्यांचा `उद्योग`. शाळेतून डोनेशन्स मिळतात आणि कोट कल्याण होते. अमरावती हे त्याचे एक उदाहरण आहे, अशी अनेक सांगता येतील. लोकसेवा करायचीच तर सरकारकडून जमीन घेऊन केंद्र-राज्य, उद्योजकांची मदत घेऊन एखादे धर्मार्थ हॉस्पिटल उघडावे असे ज्यावेळी नेत्यांना वाटेल तो अमरावती विभागासाठी सुदिन म्हणावा लागेल. खासदार-आमदार राणा कुटुंबियाला त्यासाठी सदिच्छा. मनात आणले तर सहज शक्य आहे, पहा जमते का.