अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे निधन

0
386

न्यूयॉर्क, दि. १० (पीसीबी) : ‘पीके’, ‘रॉक ऑन’ यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये छोटेखानी भूमिका साकारलेला अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून मेंदूच्या कर्करोगाशी सुरु असलेली त्याची झुंज अखेर संपली. अमेरिकेत उपचारादरम्यान साईप्रसादची प्राणज्योत मालवली.

साईप्रसाद गुंडेवार मूळ नागपूरचा होता. ‘ग्लायोब्लास्टोमा’ म्हणजेच मेंदूच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर फेब्रुवारी 2019 मध्ये तो ऑपरेशनसाठी अमेरिकेतील लॉस अँजेलसला गेला होता. मात्र भारतीय प्रमाण वेळेनुसार आज (रविवार 10 मे) सकाळी 7.30 वाजता साईप्रसादने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने त्याचे मित्रमंडळीही हळहळले आहेत.

एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला 4’ या कार्यक्रमामुळे साईप्रसादला प्रसिद्धी मिळाली. या शोमधील अनोख्या लूकमुळे त्याला अनेक कार्यक्रमांच्या ऑफर मिळाल्या होत्या. साईप्रसाद गुंडेवारने अनेक इंग्रजी मालिका, बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. साई गुंडेवार या नावाने तो ओळखला जात होता.

‘रॉक ऑन’, ‘युवराज’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ अशा हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडपट आणि लघुपटांमध्ये त्याने भूमिका केल्या. डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम’ या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे.