अबब…सोन दिवाळीत ८० हजार होणार ?

0
361

जळगाव, दि. २४ (पीसीबी) – कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता तर सोन्याच्या किंमती लवकरच 50 हजारांपेक्षा जास्त होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एवढेच नाही बाजार तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव 80 हजार रुपये प्रति तोळा होण्याची देखील शक्यता आहे.

मंगळवारी दिल्लीमध्ये 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे भाव 48,988 रुपयांवरून कमी होत 48,931 रुपये प्रति तोळा झाले होते. मंगळवारी 57 रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती. याआधी सोमवारी सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा 85 रुपये तर चांदीमध्ये प्रति किलो 144 रुपयांची घसरण झाली होती.

दरम्यान, पूर्ण जगामध्ये कोरोनाचे थैमान सुरू आहे. जवळपास 3-4 महिन्यांपासून कोरोनाचे प्रमाण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. जगभरात कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेचा परिणाम सोने बाजारावर झाला आहे. या संकट काळात सोन्याच्या किंमती वारंवार वाढून नवे रेकॉर्ड सेट करत आहेत.

49 हजाराच्या घरात पोहोचलेली किंमत आतापर्यंतचा इतिहास पाहता सर्वाधिक आहे. लॉकडाऊन काळात सोन्याच्या किंमतीने असे अनेक रेकॉर्ड रचले आहेत परिणामी लवकरच सोन्याच्या किंमती 50 हजारांपेक्षा जास्त होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते कोरोना व्हायरस पँडेमिक, भारत-चीन संघर्ष आणि अमेरिकी बँक फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर न वाढवण्याचा घेतलेला निर्णय, या सर्व कारणांमुळे सोन्याच्या किंमतीचा ग्राफ चढता आहे.

ज्वेलरी गोल्ड बाजारचे अध्यक्ष कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात अनेक देशांवर मंदीचे संकट आहे. अशा परिस्थितीत सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक वाढली आहे. सध्याच्या काळात गुंतवणूकदारांची सोने ही पहिली पसंत ठरत आहे. पण यामुळे व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण सध्या लगीनसराईचे दिवस आहेत. पण वाढत्या किंमतीमुळे अनेकजण नवीन सोने खरेदी करण्याऐवजी रिसायकल गोल्डचा वापर करत आहेत.