अन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पत्रकारांवर भडकले..

0
341

पिंपरी, दि. 2८ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश काल एका पत्रकारावर भडकल्याचं पाहायला मिळालं! गोळीबार हा पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेने झाला हे तपासात स्पष्ट झालं का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश चांगलेच भडकले.

तुम्ही पत्रकार नियोजनबद्ध कट रचून आलेला आहात. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. इतकी चांगली आणि कठोर कारवाई करुनही तुम्ही प्रश्न विचारत आहात. तुम्हाला कुणी असे प्रश्न विचारा म्हणून नियोजन करुन पाठवले आहे का? असा प्रश्न विचारतानाच मी जे बोलतो तेच करतो, असा दावा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलाय..
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने उलट आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांना सिद्धार्थ बनसोडेचा शोध होता. अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची 3 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीय.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे 11 मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी रॉड सारख्या घातक शस्त्राने दोन जणांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदारपुत्र आणि त्यांच्या पीएसह 10 जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.