अण्णांचा सूर बदलला; मोदी, फडणवीसांचे केले कौतूक

0
421

नगर, दि. २४ (पीसीबी) – मागील पाच वर्षांच्या काळात मोदी सरकारवर सातत्याने टीका करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता भलतीच मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात सरकारबद्दल बोलण्याचा पहिलाच प्रसंग माहिती अधिकार कायद्यातील दुरूस्तीनंतर आला असताना सौम्य टीका आणि अन्य कामाचे कौतूक, असे हजारे यांचे धोरण राहिल्याचे दिसून आले. हजारे यांना हाताळण्यासाठी राज्य सरकारने अवलंबलेली निती यशस्वी ठरल्याचे यातून दिसून येत आहे.

माहिती अधिकार कायद्यात बदल करण्याचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर यासंबंधी हजारे यांची काय प्रतिक्रिया असेल, याबद्दल उत्सुकता होती. मंगळवारी सायंकाळी हजारे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. एक तर हजारे नेहमीप्रमाणे सरकारवर कडवी टीका करणार, आंदोलनाचा इशारा वैगेरे देणार अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात हजारे यांनी याबद्दल सौम्य शब्दांत टीका केली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार चांगली पावले उचलत असल्याचे हजारे यांनी आवर्जून सांगितले. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राची भाषाही आता पूर्वीप्रमाणे नसल्याचे दिसून आले.