अजित पवार यांनी घेतलेला निर्णय पक्ष धोरणाच्या विरोधातला – शरद पवार

0
464

मुंबई, दि.२३ (पीसीबी)- अजित पवार यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधातला आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. महाराष्ट्रात जनमत जे आहे ते भाजपाच्या विरोधात आहे. असं असताना त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला जनता पूर्ण विरोध दर्शवेल असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. १० ते ११ सदस्य त्यांच्यासोबत गेल्याचं समजते आहे. जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचे ते करु असेही पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सक्षम सरकार बनावं यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. बहुमताचा आकडा तिन्ही पक्षांकडे होता. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ अशी संख्या होती. शिवसेनेला काही अपक्षांनीही साथ दिली होती. १७० च्या आसपास आमची आमदारसंख्या जात होती. काल आमची बैठक पार पडली. या बैठकीत काही प्रश्नांबाबत चर्चा राहिली होती. मात्र सकाळी आम्हाला राजभवनावर राज्यपालांकडे आणण्यात आले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काही सदस्य तिथे गेल्याचंही समजले. मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवारांनी घेतली. अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधातला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.