अजित पवार यांचा धमाका – आठवड्यात दुसरा शहर दौरा

0
485

आठवड्यात दुसरा शहर दौरा, शनिवारी पहाटे ५ पासून सुरवात

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता मिळवायचीच असा निश्चय केलेला दिसतो. गेल्या शुक्रवारी भल्या सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत विविध भूमिपूजन, उद्घाटनांच्या निमित्ताने शहरभर कार्यक्रम घेतले. त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत मेळावा आणि दीड तासाच्या जोशपूर्ण भाषणातून त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः चेतविले. आता येत्या शनिवारी (११ जून) रोजी भल्या पहाटे ६ वाजताच ते शहरात येणार आणि १० पर्यंत विविध ९ कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. दरम्यान, पवार यांचे दौरे पाहून शहर भाजपाची पळापळ झाली आणि भाजपानेही उचल घेतली असून माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचेही शहरात रोज गाठीभेटींचे कार्यक्रम सुरू आहेत.

अजित पवार शहराकडे लक्ष देत नाहीत, भेटत नाहीत असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप होता. २०१७ चा पराभव आणि नंतर मावळ लोकसभेतील पार्थ पवार यांच्या पराभवामुळे ते नाराज होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची दर आठवड्याला पुणे शहरात बैठक, भेटीचा कार्यक्रम असे, पण पिंपरी चिंचवडमध्ये दौरे होत नव्हते. आता पवार यांनी चांगलेच मनावर घेतले आहे. आठवड्यापूर्वीच त्यांनी भाषणात सांगितले की, यावेळी मी सकाळी ६.५५ ला आलो पुढच्यावेळी ५.५५ लाच येणार. वारंवार येणार आणि तुम्हाला (कार्यकर्त्यांना) आता पळवणार. दादा बोलल्याप्रमाणे आता भल्या पहाटे ५.५५ लाच हजर होणार आहेत.

शहराच्या दौऱ्याची सुरवात बोपखेल येथील पुलाच्या पाहणी पासून होईल. पहाटे ६ वाजता ते पुलाच्या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर भोसरी येथे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या प्रभागात, पुढे पिंपळे सौदागर मध्ये कार्यक्रम असेल. महापालिका भवनात एका सादरीकरणासाठीही ते उपस्थित राहणार आहेत. नंतर मोरवाडी येथील तारांगण प्रकल्पाचे उद्घाटन, शहरातील काही शिल्पांची पाहणी करुन शेवटी थेरगाव येथील हॉस्पिटलच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. तिथेच पत्रकार परिषदेचेही आयोजन केले आहे.