अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

0
238

– 33 कोटी वृक्ष लागवड, 2429.78 कोटी रूपये – २५ टक्के तरी झाडे जगली का, होणार सखोल चौकशी

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. सभागृहात विरोधक ठाकरे सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. मागील दोन दिवस सभागृह आरोप प्रत्यारोपानेे तापलं आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारवर आग ओकताना दिसत होते. या अधिवेशना दरम्यान सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फडणवीसांना दणका दिला आहे.
मागील सरकारच्या काळात फडणवीस सरकारकडून 33 कोटी वृक्ष लागवड मोहिम हाती घेण्यात आली होती. हा प्रकल्प फडणवीस सरकारच्या काळातील एक महत्वकांक्षी प्रकल्प मानला जातो. यासाठी 2429.78 कोटी रूपये मंजूर झाले होते. यातील 25% झाडे जिवंत का राहिली नाही? याची चौकशी करण्याची मागणी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. यानंतर या प्रकरणाची विधीमंडळ संयुक्त समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील नाना पटोलेंनी केली आहे.

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितले आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर मंत्र्यांचा भरोसा नाही का? आम्हाला चौकशीची अडचण नाहीये पण तुमचा तुमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का? असा प्रश्न फडणवीसांनी सभागृहात विचारला. हा तर तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होता. तर मग समिती नेमण्यात येणार असल्यानं तुम्हाला मिर्ची का लागली? असा जोरदार पलटवार नाना पटोलेंनी केला. दरम्यान, फडणवीस सरकारच्या महत्वकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधीमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्यात येणार आहे. पुढील सहा महिन्यात चौकशी अहवाल तयार करून सादर केला जाईल, अशी अजित पवारांनी घोषणा केली. त्यामुळे फडणवीस सरकारमधील घोटाळा बाहेर येईल का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.