“अजितदादा राजधर्म पाळा, बेवारस पिंपरी-चिंचवडकडे लक्ष द्या…” – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
579

कोरोनाच्या महाभयंकर संकटात दोन खासदार, तीन आमदार असूनही श्रीमंत पिंपरी चिंचवड शहराची अवस्था आज बिनबापाच्या पारोसारखी झाली आहे. ३० लाख लोकसंख्येचे हे स्मार्ट शहर आज रडकुंडीला आले आहे, अक्षरशः वाऱ्यावर आहे. बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन, प्लाझ्मा, ऑक्सिजन मिळत नसल्याने केविलवाणी परिस्थिती आहे. भुक्कड, भ्रष्ट, भंकस महापालिका प्रशासन फक्त कागदावर नाचते, वास्तव विचित्र आणि खूप भयंकर आहे. ज्यांना शहराचे कारभारी म्हणतात तेच आज बिळात लपून बसलेत. निवडणुका आल्या की खिशात हात घालून मतदारांवर सरबराई करणारे इच्छुक उमेदवार, कोल्हेकुई करणारे धंदेवाईक नगरसेवक सगळे कसे बेपत्ता झालेत. आम्ही हातबल आहोत, असे सांगून जबाबदारी झटकून अनेक नेते मोकळे झाले. कोरोना साथ थांबविण्याठी जी साहित्य वा ओषधे खरेदी आहे त्यातसुध्दा मलई शोधणारे महाभाग आहेत, स्वतःच मृताच्या टाळूवरचे लोणी चाटून पुसून खाणारे वर दुसऱ्याकडे बोट दाखविणाऱ्यांच्या हातात सारा कारभार गेल्याने तमाम जनता अक्षरशः सैरभैर आहे. या संकटावर मात करण्यासाठी आता या शहराला आज एक बाप पाहिजे बाप. शहराच्या जन्माला ५० वर्षे होत आली, पण या शहराला या मातीतला बाप मिळाला नाही, हे खरे दुखणे आहे. आजही सवतीच्या लेकरासारखी म्हणा की, अनौरस पुत्रासारखी अवस्था आहे. थोडीथिडकी नव्हे तर तब्बल २०-२५ वर्षे इथल्या गावकारभाऱ्यांनी बारामतीकरांची चाकरी केली. आजचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यामुळेच इथे एकहाती सत्ता उपभोगली. आज गरज असताना त्यांनीपण तोंड फिरवले. म्हणूनच आज साद घालावी वाटते, या गर्भश्रीमंत, लाडिक, थोराड पोराला कोणी बाप देते का बाप. इथले चंगू मंगू पुढारी अजूनही बाप होण्याच्या माणसिकतेत नाहीत. थोडे कठोर बोल आहेत, पण आज याच भाषेत सुनावण्याची वेळ आली आहे.

‘कोरोनाचे संकट, कोणालाच पडलेले नाही’ –
आज पिंपरी चिंचवड शहराकडे काय नाही. सत्ता, संपत्ती, पैसा, समृध्दी, जमीन, जुमला सगळे सुख पायाशी लोळण घेते, पण खावत नाही. एका कोरोनाच्या संकटात शहर होरपळतेय. शुक्रवारी रात्रीचा अनुभव. साने चौकातील एका रुग्णालयात ४० रुग्ण आहेत, आणि तेथील ऑक्सिजन दोन तासांत संपणार आहे. तेच चित्र थेरगावच्या डांगे चौकातील, दोन दिवसांपूर्वी तोच नजारा वाल्हेकरवाडीतील ऑक्सिरीच हॉस्पिटलचा. जंबो कोव्हिड सेंटरला संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन असल्याचे समजले आणि तमाम अधिकाऱ्यांची गाळण उडाली. शहर, जिल्हा आणि पुणे करांसाठीही संजिवनी ठरलेल्या महापालिकेच्या वायसीएम या सर्वात मोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांची तिच धावपळ. निव्वळ ऑक्सिजन पाईपच्या २६.३१ कोटींच्या कामात ८.५० कोटींची मलई काढू पाहणारे तमाम भ्रष्ट पुढारी गेले कुठे. सत्य कटू असते पण वास्तवात हा खर्च अवघा ५ ते ७ कोटी आहे. म्हणजे मलईच मलई चाखली. ऑक्सिजनचे ५०० बेडची व्यवस्था सहा महिने उशिराने झाले, ते भागीदारीत टेंडर घेऊ पाहणारे चार-पाच नगरसेवक आणि ती नगरसेविकाही आता पेशंटला ऑक्सिजन पाहिजे तर लपून बसलेत. १०० मेट्रीक टनाचा एक ऑक्सिजन प्लँन्ट उभा करायला फक्त २.९७ कोटी रुपये खर्च येतो, त्यात तब्बल २००० सिलेंडर भरतात. कोरोनाचे संकट कायम राहणार म्हटल्यावर हे नियोजन पूर्वी केले असते तर आज लोक मेले नसते. आता हे झारितील शुक्राचार्य आहेत त्यांना जनतेने लक्षात ठेवायची वेळ आहे. महापालिकेच्या निवडणुकिसाठी स्वतःचे दोन-चार कोटी खर्च कऱणाऱे नगरसेवक आता कुठे गेले याचा जाब जनतेने विचारला पाहिजे. स्मार्ट सिटीच्या कामात २५-५० कोटी रुपयेंचा मलिदा आणि ३००० कोटींच्या कामांत टक्का वसूल करणारे आज रेमडेसिवीर अथवा ऑक्सिजन साठी एक रुपया खिशातून काढत नाहीत, हे लोक पाहतात. दिवाळी भेट, दिवाळी पहाट कार्यक्रमांसाठी कोटी रुपये खर्च कऱणारे नगरसेवकसुध्दा गायब झालेत. एका आमदारांनी आमदार निधीतून रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी २५ लाख दिले, दुसऱ्याने रेमडेसिवीर खरेदीला तर तिसऱ्याने सीटी स्कॅन यंत्रासाठी निधी दिला. खरे तर, या तिघांनी एकत्र बसून ओडिसा राज्यातून विमानाने ऑक्सिजनचा टँकर आणला पाहिजे. मनात आणले तर ३० लाखापैकी २५ लाख जनतेचे मोफत लशीकऱण महापालिका करू शकते. मतदानाच्या वेळेत मत खरेदी करताना मताला ५००-१००० रुपये देतील पण, ४०० रुपयांची कोरोना लस खरेदी करायची तर हजारदा विचार करतील. इतके कद्रू राज्यकर्ते लाभले हे या शहराचे दुर्भाग्य. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी ७० कोटी रुपये खर्च करणारे, विधानसभेसाठी १०-१५ कोटी उधळणारे या शहरात आहेत. शिवसेनेच्या एका आमदाराने स्वतःची ९० लाखाची ठेव पावती मोडून रेमडेसिवीर इंजेक्शन लोकांसाठी खरेदी केली. पिंपरीतील भाजपाचेच एक नगरसेवक संदीप वाघेर हे ५० बेड, व्हेंटीलेटर आणि हायड्रो मशिन स्वतः खरेदी करून महापालिकेला देतात. हा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेतील शहरातील कारखानदार, बिल्डर्स यांच्या मदतीने आणि नगरसेवकांनी मनावर घेतले तर रेमडेसिवीर, ऑक्सिजन, मास्क, रुग्णांना जेवण असे अगदी सोन्याचे ताट देता येईल. नगरसेवक, आमदार, खासदार यांनी सर्वांनी मतभेद बाजुला ठेवले तर कोरोनाचे संकट किरकोळ आहे. आज एक बाप नसल्याने पोरे उनाड झालीत.

‘अजितदादा एका मावळच्या पराभवाचे इतके उट्टे’ –
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माननारे शहरात गल्लीबोळात आहेत. २०-२५ वर्षांत दादांनी शहर घडवले. विकास कामांच्या प्रत्येक शिळेवर भूमिपूजन आणि उद्घाटनात दादांचे नाव कोरलेले आहे. पान टपरी ते हॉस्पिटल कशाचेही उद्धाटन असो, दादा येत असतं. लग्नाच्या प्रत्येक पत्रिकेत बापाचे नाव मागे पण दादांचे नाव आत बाहेर छापतात, इतका घरोबा. एकूण एक कार्यकर्त्यांची नावे दादांना तोंडपाठ. रस्ते, गल्ली, चौक अशी रेघनरेघ तोंडपाठ. शहराला कशाचीही कमी पडू न देणारे दादा प्रथम २०१७ मध्ये महापालिकेत भाजपाकडून सडकून आपटी खाल्यापासून नाराज आहेत. त्यातच नंतर २०१९ मध्ये मावळ लोकसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा दणकून पराभव झाल्याने अजितदादांनी शहराशी कट्टी धरली. पूर्वी शहरात खट्ट वाजले तरी विचारणारे दादा आता कोरोना संकटात शहर टाहो फोडतोय तरी ढुंकून बघायला तयार नाहीत. दादांचे तमाम शागिर्द सत्ताधारी भाजपाची गंमत पहातात. मुळात अजितदादांचे रुसने हे त्यांच्या एकाही कार्यकर्त्याला रुचलेले नाही. भाजपाशी असलेली सलगीसुध्दा राष्ट्रवादीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना पटलेली नाही. स्मार्ट सिटीत भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनसुध्दा दादा लक्ष देत नाही तेव्हा कुठेतरी पाणी मुरते हे जाणकार कार्यकर्तेसुध्दा ओळखतात. देवेंद्र फडणवीस नागपूरसाठी वाट्टेल ते करतात, मुख्यमंत्री ठाकरे मुंबईला कशाची कमी पडू देत नाहीत, दादा स्वतःच्या बारामतीला ठेस लागली तरी पपळत जातात. ज्या पिंपरी चिंचवडकरांनी २५ वर्षे जीव लावला नव्हे दादांवरून जीव ओवाळून टाकला त्यांना आता उपऱ्याची वागणूक मिळते हे बरे नव्हे. आज शहराने ज्यांना बापाची जागा दिली त्यांनीच घराचे दारे खिडक्या विकायला काढल्या. शहर आजाराने कुढतेय, दोन हजार घरांना सुतक पडले पण आश्रू पुसायला कुणी कुणी आले नाही. मोठे साहेब शरद पवार यांचा वारसा दादा सांगतात, पण शहराच्या आपत्तीकाळात नजर चुकवून दुरून जातात. दादा तुम्ही राजधर्म पाळा इतकीच माफक अपेक्षा आहे. शहराला आज जे कमी पडते ते तुम्ही चुटकीसरशी भरून काढू शकतात. आताच्या कारभाऱ्यांना त्याचे पडलेले नाही. जनता वाऱ्यावर आहे हो. भोसरीचे आमदार भोसरीपूरते बोलतात. पिंपरीचे कोणाला दिसत नाहीत आणि चिंचवडचे कोणाच्याही संपर्कात नाहीत. दोन्ही खासदारसुध्दा फिरकत नाहीत. शहर कुठेतरी अनाथ असल्याचा भास होतोय. कोरोना अजून वर्षे दोन वर्षे पाठ सोडणार नाही. शहर तरून गेले पाहिजे, प्रत्येकाला इथे सुरिक्षत वाटले पाहिजे. १०० टक्के लसिकऱण करून देशात पहिले कोरोनामुक्त शहर हा संकल्प सिध्दीस जाणे इथे सहज शक्य आहे. फक्त एक बाप हवा.