अखेर भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
546

नवी दि्ल्ली, दि. ६ (पीसीबी) – भाजपमधील नाराज नेते व  खासदार  शत्रुघ्न सिन्हा यांनी आज ( शनिवारी)  अखेर  काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांचे लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर  त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती.

दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, भाजपच्या स्थापना दिनीच भारतरत्न नानाजी देशमुख, दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी , लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या निष्ठावंत मार्गदर्शकांचा भाजप सोडताना दुःख होत आहे.  लोकशाहीला हुकूमशाहीत परावर्तीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यामुळे  नाईलाजाने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असे सिन्हा म्हणाले.

काँग्रेस  मला आपल्या लोकांच्या, देशाच्या आणि समाजाच्या सेवेची संधी देईल. एकता, समृद्धी, वाढ, विकास आणि प्रतिष्ठा यामाध्यमातून मला ही संधी मिळावी, अशी अपेक्षा सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केली. काँग्रेस पक्ष हा महात्मा गांधी, नेहरु, पटेल आणि इतर महान राष्ट्र घडवणाऱ्या लोकांचा पक्ष असल्याचे ते म्हणाले.