Maharashtra

अखेर, बीकेसी मैदानात शिंदे गटाने मारली बाजी…!

By PCB Author

September 18, 2022

मुंबई,दि.१८(पीसीबी) – शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे आता दसरा मेळावा घेण्यावरूनही शिवसेना आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिवतीर्थावर जर परवानगी मिळाली नाहीतर बीकेसी मैदानावर जागा मिळवण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर, बीकेसी मैदानात शिंदे गटाने बाजी मारली आहे.

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. तर शिंदे गटाने सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटाने शिवतीर्थावर जागा मिळाली नाहीतर बीकेसी मैदानावर तयारी सुरू केली होती. बीकेसी मैदानावर परवानगी मिळवण्यासाठी शिंदे गटाने अर्ज केला होता. त्यासाठी एमएमआरडीएने शिंदे गटाला परवानगी दिली आहे.

शिवसेनेनं सुद्धा बीकेसी मैदानासाठी अर्ज केला होता. पण, आधीच शिंदे गटाने अर्ज केला होता, त्यामुळे शिंदे गटाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. जर शिवसेनेला परवानगी मिळाली तर यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावा पाहण्यास मिळणार आहे.

मैदान देण्यावरून अडचण का राजकारण? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मैदान देण्यावरून राजकारण सुरू आहे का सुप्रीम कोर्टात अडचण होऊ नये म्हणून परवानगी मिळत नाहीये, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शिवसेना नेमकी कुणाची यावरून सध्या सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळावी, असं पत्र पाठवण्यात आलं. यातलं एक पत्र शिवाजी पार्कसाठी बीएमसीला आणि दुसरं पत्र बीकेसी मैदानासाठी एमएमआरडीएला पाठवण्यात आलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे, या दोन्ही मैदानांना परवानगी देणाऱ्या यंत्रणा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नगरविकास खात्यामध्ये येतात. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला यातल्या एका मैदानात जरी परवानगी दिली तरी याचा वापर सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी केला जाऊ शकतो. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास खात्याने शिवसेनेच्या पर्यायाने उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला परवानगी दिली, हे ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात सांगितलं जाऊ शकतं, जे शिंदेंसाठी अडचणीचं ठरू शकतं.