अखेर बहुप्रतिक्षित MPSC निकाल जाहीर; प्रसाद चौगुले राज्यात पहिला तर महिलांमध्ये मानसी पाटील अव्वल

0
346

पुणे, दि.२९ (पीसीबी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अंतिम सुधारित निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला आहे. या निकालात कराडच्या प्रसाद चौगुलेने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तर मानसी पाटील राज्यात पहिली आलीय. दोन वर्षानंतर निकाल जाहीर झाल्याने मुलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विद्येचं माहरघर असलेल्या पुण्यात एमपीएससीच्या निकालाने रात्री दिवाळीसारखं वातावरण पाहायला मिळालं.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल जाहीर केला आहे. एमपीएससीने या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एमपीएससी 413 पदांच्या निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात प्रसाद चौगुले राज्यात पहिला आलाय. तर अगोदरच एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सेल टॅक्स इन्स्पेक्टरपदी कार्यरत असणाऱ्या मानसीला या परीक्षेतही उज्वल यश मिळालं. परिश्रम आणि अभ्यासाचं योग्य नियोजन केल्याने यश मिळाल्याची भावना दोन्ही यशवंतांनी व्यक्त केली.

मुळचा कराडचा असलेल्या प्रसाद चौगुलेने इंजिनिअरींचं शिक्षण घेतलंय. नंतरही एका मल्टीनॅशनल कंपनीत एक वर्ष नोकरीही केली. पण नंतर स्पर्धा परीक्षेचा डोक्यात विचार आला आणि त्याने तयारी सुरु केली. पुण्यात येऊन अधिकारी होण्याचं स्वप्न रंगवलं. आठ ते दहा तास अभ्यास, परीक्षेच्या तोंडावर योग्य नियोजनाने यश मिळाल्याची भावना, प्रसादने व्यक्त केली.

माझे वडील महावितरणमध्ये ऑपरेटर पदावर होते. दोन वर्षांपूर्वी ते रिटायर झाले. घरात शैक्षणिक वातावरण होतं. दोन्ही मोठ्या बहिणी इंजिनिअर होत्या. त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला. घरातूनही मला नेहमी पाठिंबा होता. आज निकाल लागलाय. राज्यात पहिला आलोय. चार वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरल्याचा मनोमन आनंद होतोय, अशा भावना प्रसादने व्यक्त केल्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मानसी पाटील ही महिला उमेदवारांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. मानसी पाटील हिच्या यशानंतर तीच सर्वत्र कौतुक होतंय. मानसी सध्या नाशिकमध्ये सेल टॅक्स इन्स्पेक्टरपदी कार्यरत आहे. यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये मानसी राज्यात दुसरी आली होती. मात्र आता सुधारित निकालामध्ये मानसी 420 मुलींमध्ये राज्यात प्रथम आली आहे.