अखेर नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

0
389

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचा अधिकृत भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळत आहे. मंगळवारी (दि.२)  दुपारी ४ वाजता गरवारे क्लब येथे  राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश आणि नितेशही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये मराराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करणार असल्याचे संकेत याआधी राणे यांनी दिले होते. त्यामुळे पक्षप्रवेशाबरोबरच ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ही भाजपमध्ये विलीन करण्यात येईल, अशी शक्यता  आहे.

भाजप प्रवेशानंतर कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नारायण राणे मित्रपक्ष शिवसेनेचे पारंपरिक शत्रू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे   नारायण राणे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला होता. मात्र, शिवसेनेचा विरोध मावळल्याने   राणेंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.