‘अखेर अहमद पटेल यांच्यावरही काळाने सूड उगवला, कर्माचा सिध्दांत लागू झाला…’

0
627

नवी दिल्ली, दि.२७ (पीसीबी) – रंक असो वा राव, कर्माचा सिध्दांत प्रत्येकालाच लागू आहे. जे काही बरे-वाईट कर्म कराल त्याचे फळ याच जन्मात मिळते, असे म्हणतात. एका अर्थाने ते तंतोतंत खरे आहे. अगदी काल परवाचेच उदाहरण घ्या. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांना अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत निरोप द्यावा लागला. कारण कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार सर्व विधी पार पडले, मूक पध्दतीनेच दफन झाले. कर्म सिध्दांत त्यांनाही लागू झाला. त्याचे कारणही तसेच आहे.

भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाऊ शकते त्या पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे 23 डिसेंबर 2004 रोजी निधन झाले. सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृतदेह अडीच वाजताच्या सुमारास 9 मोती लाल नेहरू मार्गावर आणला गेला. यानंतर खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली. तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राव यांच्या छोट्या मुलाला प्रभाकर यांना अंतिम संस्कार हैदराबादमध्ये करण्याची सूचना केली, परंतु हे कुटुंब दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्याबाबत अडून राहिले होते. थोड्या वेळाने तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आणखी एक निकटचे मित्र गुलाब नबी आझाद 9 मोतीलाल नेहरू मार्गावर पोहोचले. त्यांनीही राव यांच्या कुटुंबीयांना मृतदेह हैदराबाद येथे नेण्याचे आवाहन केले. हे सर्व करायला भाग पाडणारे सोनिया गांधी यांचे सच्चे सल्लागार अहमद पटेल हे कारणीभूत होते.

नरसिंहराव यांच्या अंत्यसंस्कारावर काँग्रेसने राजकारण केले. बाबरी मशिद पाडण्याला राव यांचे अप्रत्यक्ष पाठबळ असल्याचे आक्षप काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतले होते. १९९१-९२ मध्ये ज्या आर्थिक सुधारणांसाठी देशाचे दरवाजे राव यांनी खुले केले त्याची जगभरात तरफदारी झाली आणि राव यांचे नाव कायम चर्चेत राहिले. राजीव गांधी यांचे नाव त्यात झाकोळले गेले. त्यांचे अंत्यसंस्कार आणि स्मारक दिल्लीत व्हावे ही त्यांच्या कुटुंबियांची मागणीसुध्दा काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी फेटाळून लावली आणि अखेर अंत्यसंस्कार हैद्राबादलाच करणे भाग पडले. त्यामागचे खरे सुत्रधार अहमद पटेल होते. राव यांचा मृतदेह कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी काँग्रेस भवनात ठेवायचा होता, पण मृतदेह ठेवण्यासाठी कॉंग्रेस मुख्यालयाचे गेटसुध्दा उघडले नाही,तर जाणीवपूर्वक बंद ठेवण्या आले होते. राव यांच्यासारख्या विद्यावान नेत्याबद्दल काँग्रेस वर्तुळात इतकी वाईट प्रतिमा निर्माण करण्याचे काम झाले. सोनिया गांधी यांच्या भोवताली जे वर्तुळ होते त्यांनीच त्या कुरघोड्या केल्या आणि त्यात अहमद पटेल यांचे नाव घेतले गेले. काळ कसा सूड उगवतो ते परवा दिसले. पाच दशके काँग्रेसची सूत्र सांभाळणारे अहमद पटेल यांच्या सारख्या नेत्याचे कोरोनामुळे निधन झाले आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला काँग्रेस काय कोणीही नेत्याला उपस्थित राहता आले नाही. पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासारख्या नेत्याची शेवटच्याक्षणी जी अवहेलना झाली त्याचा काळाने सूड उगवला, असे जुने जाणते काँग्रेसी सांगतात आणि सोशल मीडियावरही आता तीच प्रतिक्रीया आहे.