अखेर अण्णा बनसोडे यांच्या मुलाला जामीन

0
472

पिंपरी, दि. 9 (पीसीबी) : खूनाच्या प्रयत्नाच्या दोन गुन्ह्यांत आरोपी असलेला पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ याला दीड महिन्यानंतर गुरुवारी (ता. ८) जामीन मिळाला. १२ मे रोजी बनसोडेंच्या कार्यालयात गोळीबाराची आणि त्यानंतर बेदम मारहाणीची घटना घडली होती. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.

शहरात कचरा गोळा करण्याचा ठेका घेतलेल्या ए.जी. ए्न्व्हायरो कंपनीचा मॅनेजर तानाजी पवार याने अपशब्द वापरल्याने त्याला सिद्धार्थ व आमदाराच्या पीएसह इतर कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी आपला जीव वाचविण्यासाठी पवारने दोन गोळ्या झाडल्या होत्या. या मारहाणीत पवार गंभीर जखमी झाला होता. या घटनेबाबत खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे परस्परांविरुद्ध दाखल करण्यात आले होते.
त्याअगोदर सिद्धार्थ व त्याच्या साथीदारांनी या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयात जाऊन तेथील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर हल्ला होता. त्याबाबतही खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा सिद्धार्थ व साथीदारांविरुद्ध दाखल झाला होता. या घटनेनंतर आऱोपी फरार झाले होते. दोन आठवडे गुंगारा दिल्यानंतर २७ मे रोजी सिद्धार्थ व इतर दोघांना रत्नागिरीतून पकडण्यात आले होते. नंतर आणखी सहाजण पकडले गेले. 

त्यातील सिद्धार्थ, सतीश लांडगे व भोला यादव या तिघांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला, अशी माहिती त्यांचे वकील अॅड. अतिश लांडगे यांनी दिली. आता बाकीचेही आरोपींच्याही जामिनाचे अर्ज देणार असल्याचे त्यांनी सांगितले.  सिद्धार्थ व इतर आरोपीविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती लांडगे यांनी दिली. तपासात अडथळा न आणण्याची अट घालून तीस हजार रुपयांच्या हमीपत्रावर आऱोपींना न्यायालयाने जामीन दिला. त्यांची सायंकाळी येरवडा कारागृहातून सुटका झाली.