अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा- अजित पवार

0
439

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – मुंबई, ठाणे, नागपूर ही शहरे वगळता इतर महाराष्ट्रात देखील अंमली पदार्थ घेण्याचे प्रकार वाढले आहेत. हे प्रकार रोखायचे असतील तर तर अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सभागृहात केली. मुंबई आणि ठाणे या भागांमध्ये अंमली पदार्थांची विक्री कुरिअर आणि पोस्टामार्फत होत असल्याची लक्षवेधी लक्षवेधी आज विधानसभेत विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी उपस्थित केली.

अंमली पदार्थांमुळे तरूण पिढी बरबाद होत आहे. कॉलेज असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ विकण्याचे प्रकार वाढले आहेत. आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे ११वी, १२वीला असणारा मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करते? हे कळत नाही ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करू तसेच मुंबई शहरात स्थापन केलेला स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्याकरीता मुंबईत पाच स्वतंत्र कक्ष कार्यरत असल्याचेही रणजित पाटील यांनी सांगितले. या कक्षांना मनुष्यबळ आणि निधीची आवश्यकता आहे, तो निधी वाढवून देण्यासाठी शासनस्तरावर आमचे प्रयत्न सुरु असल्याचेही रणजित पाटील म्हणाले. भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी अंमली पदार्थांची ‘खिशातली दुकाने’ याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले.