स्व.प्रियांका घोलप (उमरगेकर) मृत्यु प्रकरणी खेड न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

84

आळंदीच्या आरोपी उमरगेकर कुटुंबियांना न्यायालयाचा झटका; आरोपींचा कारागृहातील मुक्काम वाढला

खेड दि.०४ (प्रतिनिधी)- आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने (१० जुलै) संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे आळंदी परिसरात एकच खळबळ उडाली होती. लग्नातील उर्वरित फर्निचर व इतर वस्तुसाठी नवरा, सासु व सासरे प्रियंकाला मानसिक व शारीरिक छळ करत असल्यानेच ही घटना घडली असून त्यांच्याविरोधात आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करून त्यांची रवानगी सध्या येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. आरोपी कुटुंब वारंवार न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज करत असताना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मे.खेड न्यायालयाने त्यांना पुन्हा आज जोरदार चपराक देत त्यांचा जामीन अर्ज नामंजुर करत आरोपींच्या कारागृहातील स्थान निश्चित केले, यावेळी न्याय मिळण्याचा अपेक्षेने न्यायालयात आवर्जुन प्रियांकाचे वडील बापु घोलप व आई मा.नगरसेविका कमल बापु घोलप उपस्थित होते.

घटना घडल्यानंतर सदर आरोपींना अटक करून जेव्हा खेड न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी निगडीतील शेकडो संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रियांकाला न्याय मिळण्यासाठी व आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी आक्रमक झाल्या होत्या यावेळी पोलिसांची मोठी दमछाक झाली होती.

प्रियंका अभिषेक उमरगेकर (वय अंदाजे २२) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. प्रियंका उमरगेकर या आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सूनबाई होत्या आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका कमल बापु घोलप यांची ती मुलगी आहे, विशेष म्हणजे नऊ महिन्यांपूर्वीच प्रियंका यांचे लग्न झाले होते. आणि लग्नात घोलप परिवाराने लाखो रुपये खर्च करत मुलीच्या सुखासाठी व उमरगेकराच्या मागणीवरून महागडी चारचाकी व दुचाकी गाडी घोलप यांनी दिली होती, परंतु उर्वरित फर्निचर व वस्तुसाठी उमरगेकर कुटूंबीय प्रियांकाचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करत होते व त्यातुनच प्रियांकाला आपला निष्पाप जीव गमवावा लागला, ही आत्महत्या नसुन तिचा खुन करण्यात आला यास तिचा नवरा व सासु सासरे हेच जबाबदार असुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी रीतसर तक्रार प्रियंकाच्या आई वडिलांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.