साहेबांच्या थोरल्या भगिनी सरोज पाटील यांचेही पाठबळ सुप्रिया सुळेंना

0
110
  • शरद पवारांचा पराभव होईल असं त्यांना (भाजपा) वाटतं, पण…

महाराष्ट्रातली सर्वात रंगतदार लढाई होणार आहे ती म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे उभ्या राहणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणजेच घड्याळ चिन्हावर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत. ही लढत निश्चित मानली जाते आहे. राज्याच्या राजकारणातील सर्वात रंगतदार आणि चुरशीचा हा सामना असणार आहे. आजवर पवार कुटुंबाने १७ निवडणुका जिंकल्या. पवार यांना हरविण्यासाठी भाजप आणि सर्व विरोधकांनी जंग जंग पछाडले. रथी महारथी लढले, पण शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा पराभव कोणी करू शकले नाही. आता एक धक्का और दो म्हणत भाजपने पवार यांच्या घरातच सुरूंग लावला आहे. फोडा आणि राज्य करा या ब्रिटीश नितीचा वापर भाजपने केला. इतके करूनही बारामतीचा बुरुंज ढासळला नाही, असे म्हणतात.

रणशिंग फुंकले आणि लढाई सुरू झाली आहे. अजितदादा पवार यांचे कुटुंब विरोधात संपूर्ण पवार फॅमिली अशी सरळ सरळ विभागणी झालीय. सुरवातीला चुलत भगिनी खासदार सुप्रियांने अत्यंत संयमी भाषेत विरोध सुरू केला. दादांनी बारामतीकरांना दमात घेतल्यावर सुळे ताईंचा पारा चढला. दिमतीला आमदार रोहित पवार यांनी फटाके फोडले. नंतर अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास यांनी काटेवाडीतूनच दादांवर तोफ डागली आणि आवाज थेट दिल्लीच्या तक्तापर्यंत जाऊन पोहचला. दादांची वहिनी शर्मिलाताई यांनी त्यात भर घातली आणि साहेबांचे ऋण मानले. आता तर साहेबांची थोरली बहिण म्हणजे दिवंगत जेष्ठ नेते एन.डी.पाटील यांच्या पत्नी सरोजताई यांनी भाजपवर आरोप केला आणि अप्रत्यक्षपणे दादांची चूक लक्षात आणून दिली आहे.

जुलै २०२३ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातले दिग्गज नेते असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात उभी फूट पडली. कारण २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवारांनी सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर पक्षावरही दावा सांगितला. निवडणूक आयोगाने शिवसेनेप्रमाणेच निकाल देत पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवारांना दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत.अशात लोकसभेच्या रणसंग्रामात बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगताना दिसणार आहे. या प्रकरणी आता सरोज पाटील यांनी भाजपावर आरोप केला आहे.

काय म्हणाल्या आहेत सरोज पाटील?
“मी कुटुंबातलीच सदस्य आहे, मी हे तुम्हाला सांगते, भाजपाला सुप्रिया सुळेंना पाडायचं आहे आणि सुनेत्राला निवडून आणायचं आहे. त्यामुळे शरद पवारांचा पराभव होईल असं त्यांना (भाजपा) वाटतं. पण बारातमीत शरद पवारांनी केलेलं काम, लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अजितने काम केलं आहे, अजित काम करतो पण या सगळ्याचा पाया शरदने घातला. पहिल्यांदा शरद आमदार झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण घरी आले होते आणि म्हणाले होते शरद ही मतं तुझी नाहीत, ही मतं तुझ्या आई वडिलांची आहेत. तुझ्या आई वडिलांनी सामाजिक पाया घातला आहे. त्यामुळे तू तुझी मतं मिळव. शरदने प्रचंड काम केलं आहे, त्यामुळे तो पडणार नाही.

सुनेत्रा आणि सुप्रिया दोघीही निर्मळ आहेत पण…
सुनेत्रा आणि सुप्रिया दोघीही निर्मळ, सोज्वळ आहे. या दोघींना परस्परविरोधात लढवलं जातं आहे हे दुर्दैव आहे. पण दोघींचा स्वभाव चांगला आहे. पण सुप्रियाचा अभ्यास प्रचंड आहे. सुप्रिया सोन्याचा चमचा जरी तोंडात घेऊन जन्माला आलेली मुलगी.. पण एक इंग्रजी शब्दही तिच्या तोंडी नाही. सुप्रियाने प्रयत्न करुन तिची मराठी भाषा सुधरवली. तिच्यात खूप कणखरपणा आला आहे. तिला मुळीच गर्व नाही. तिच्यामध्ये आणि सुनेत्रात महत्त्वाचा फरक म्हणजे सुप्रिया संसदरत्न आहे. विरोधी पक्षाने तिला हे दिलं आहे. तडफदार भाषणं करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. तिची भाषणं मोदीही ऐकत असतात. ती फिरते, गरीबांना मदत करते, शिक्षणसंस्थेत ती काम करते. तेवढा अभ्यास सुनेत्राचा नाही” असं सरोज पाटील यांनी म्हटलं आहे.