सामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण

35

पिंपरी, दि. ३(पीसीबी) – सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २६ मधील लुंबिनी बुद्ध विहाराच्या आवारात देशी वृक्षांचे रोपण केले.

याप्रसंगी माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष चांदबी सय्यद, लायन्स क्लबचे विभागीय अध्यक्ष दिलीपसिंह मोहिते, मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्ष माधुरी ओक आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सलीम शिकलगार यांनी प्रास्ताविकातून, “कोणताही वृक्ष निवाऱ्याला आलेल्यांना धर्म, जात, पात, पक्ष, लिंग हे भेदाभेद न मानता शीतल छाया देतो. या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन सर्वांनी एकत्र येऊन वृक्षारोपण करावे ही संकल्पना मांडली अन् त्याला अपेक्षेपेक्षाही मोठा प्रतिसाद मिळाला!” अशी भावना व्यक्त केली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शाखा, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, सुसंगती ज्येष्ठ नागरिक संघ, मधुश्री कला आविष्कार, तक्षशिला बुद्ध विहार मंडळ, शब्दरंग साहित्य कट्टा, जिव्हाळा महिला बचत गट महासंघ या संस्थांच्या सदस्यांनी ‘जय श्रीराम’ , ‘जय शिवराय’ , ‘जय भीम’ असे जयघोष करीत आंबा, चिंच, सीताफळ, पेरू, अंजीर इत्यादी देशी वृक्षांचे उत्साहात रोपण केले; तसेच ‘प्लास्टिकला नकार द्या!’ हा सामुदायिक संकल्प सोडण्यात आला. प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.