श्रीरंग बारणे कमळावर लढणार ?

0
250

मावळ, दि. २4 (पीसीबी) -मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेच्या उमेदवारीच्या मुद्यावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. भाजपने या जागेवर दावा केल्याने बारणे यांची कोंडी झाली आहे. दुसरीकडे भाजपमधून पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी उनमेदवारी मागितली , तर राष्ट्रवादातून जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर आणि आमदार सुनिल शेळके यांनी संधी मागितल्याने पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, ज्या पध्दतीने शिरूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत पाठवून घड्याळ चिन्हावर लढण्याचे आदेश स्वतः शिंदे यांनी दिले तसेच आता बारणे यांनाही कमळ चिन्ह म्हणजे सरळ भाजपमधून लढण्यास सांगायचे आणि प्रश्न निकाली काढायचा, असा तोडगा महायुतीत चर्चेला आहे. स्वतः बारणे यांना परिस्थितीची जाण असल्याने त्यांची तयारी आहे मात्र, एक एक जागा गायब होत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढे प्रश्न पडला आहे. खासदार बारणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरून निवडणूक लढवावी, असा आग्रह भाजपच्या वरिष्ठांनी धरला आहे.
मावळमध्ये महाआघाडीकडून संजोग वाघेरे-पाटील यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, महायुतीच्या गटात तूर्तास अंतर्गत घडामोडी चालू आहेत. उमेदवार जाहीर होत नसल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.
महायुतीच्या उमेदवारीबाबत वेगवेगळ्या यंत्रणांच्या सर्वेक्षण अहवालाचा आधार घेतला जात आहे. मतदारसंघात समाविष्ट असणारी पिंपरी-चिंचवड आणि पनवेल महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. याशिवाय विधानसभेचे दोन आमदार, विधान परिषदेच्या एक आमदार भाजपच्या आहेत. एका अपक्ष आमदाराने भाजपला पाठिंबा दर्शविला आहे. याशिवाय नगरपालिका, पंचायत समित्यांवर भाजपचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. या परिस्थितीत महायुतीच्या उमेदवाराने भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला जात आहे. माजी मंत्री बाळा भेगडे, पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नावाचा विचार व्हावा, अन्यथा शेवटचा पर्याय म्हणून बारणे यांनी कमळावर लढावे, असा तोडगा समोर आला आहे.

गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी सद्यःस्थितीत शिवसेनेत फूट पडली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) नाव घेतले जात आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत शिंदे गटाकडे प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुरेसा संच नाही. मजबूत संघटन नाही. त्यामुळे बारणे हे भाजपमधून थेट कमळ चिन्हावर निवडणूक लढले तर भाजपची पूर्ण यंत्रणा जीव ओतून काम करेल, असे दिल्लीतील पक्षश्रेष्टींना कळविण्यात आले आहे.
मतदारसंघात शिंदे गटाकडे एकही आमदार तसेच कार्यकर्त्यांचा संच, यंत्रणा नसल्याने खासदार बारणे यांना शिवसेनेचा धनुष्य चालविणे अशक्य असल्याचा अंदाज आल्याने ते स्वतः संभ्रमात आहेत. महायुतीत जागा तसेच उमेदवारी भाजपची आणि उमेदवारसुध्दा बारणे असतील तर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांना खूप जड जाऊ शकते, असे समोर आल्याने आता कमळ चिन्ह हाच पर्याय बारणे यांच्यापुढे आहे.