शिवसेनेचे ‘निष्ठापत्र’

49

पिंपरी दि. ३ (पीसीबी) – “मी अमूक अमूक (नाव) प्रतिज्ञापत्र लिहून देतो की, मी शिवसेनेशी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नेहमी एकनिष्ठ राहीन. पक्षप्रमुखांना माझा पूर्ण पाठिंबा आहे…”

शिवसेना स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे गट किती केविलवाणी धडपड करीत आहे, त्याचे हे आणखी एक उदाहरण. शिवसेनेतील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून असे प्रतिज्ञापत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले जात आहे. एकदम अनोखा फंडा ! पक्ष असो, संघटना असो की संस्था असो, त्याचे सदस्य झाले की आपण त्यांचे झालो, असाच आपला समज होता, अनुभव होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तो खोटा ठरविण्याचा चंग बांधला आहे ! ज्याला ध्येयधोरणे, रचना, कर्ताधर्ता मान्य असतो तोच सदस्य होतो, हा परंपरागत विचार आणि पद्धत त्यांना खोडून काढायची आहे. नुसते सदस्य असून चालणार नाही. निष्ठेचे प्रतिज्ञापत्रही द्यावे लागेल. तेव्हाच तुम्ही खरेखुरे शिवसैनिक !
पक्षाची आणि पक्षप्रमुखाची गुलामी लेखी स्वरूपात स्वीकारायची ही योजना म्हणजे घराणेशाही आणि हुकुमशाही याच्याही पुढचे पाऊल ! शिवसेनेतील ताज्या घडामोडींनी हे पाऊल टाकायला बाध्य केले, असे आजतरी दिसत आहे. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनतृतीयांश बहुमतासह शिवसेना विधिमंडळ पक्षच पळविल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मूळ शिवसेना पक्षाचे तरी असे हाल होऊ नये यासाठी केलेला‌ हा इलाज कितपत लागू पडतो, ते भविष्यात दिसेलच.

पण, आज अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्यांनी मनगटावरील ‘शिवबंधन’ जुमानले नाही आणि बंडखोरी केली, त्यांच्यासारखेच इतरही शिवसैनिक या कागदाच्या तुकड्याला काही किंमत देणार नाही कशावरून ? या कागदाचा कायदेशीर दर्जा, आधार, मूल्य, परिणाम काय ? प्रतिज्ञापत्र न पाळणाऱ्यांना काही शिक्षा/दंड दिला जाऊ शकतो का ? यातले काहीच साध्य केले जाऊ शकणार नसेल तर ठाकरे गटाने हा उपद्व्याप केलाच कशासाठी ?
बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या ‘अभिनव’ योजनेचा समाचार घेताना सांगितले की, असे प्रतिज्ञापत्र परिणामकारक ठरू शकत नाही. बंधन हे प्रेमाचे हवे, विश्वासाचे हवे. (जसे, ‘शिवबंधन’) निष्ठेची, पाठिंब्याची लेखी हमी घेणे हा शिवसैनिकांवर सरळसरळ अविश्वास आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तर या योजनेचे वाभाडेच काढले आणि प्रतिज्ञापत्र ठाकरेंवरच उलटवण्याचा प्रयत्न केला. तुमचे प्रतिज्ञापत्र फाडून टाकून लोक निघून गेले तर काय करून घ्याल, असा तिरकस सवाल त्यांनी केला. “मी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व या मुद्यांपासून कधीही दूर जाणार नाही” असे प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांनी तुम्हाला मागितले तर द्याल काय, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

एकूण, हे प्रतिज्ञापत्र ‘फेसबुक लाईव्ह’ सारखेच आभासी ठरणार, हे स्पष्ट दिसत असतानाही ठाकरे गटाने ही योजना का आणली असेल ? याचे उत्तर पुन्हा घराणेशाहीतच दडलेले आहे ! कसेही करून शिवसेनेवर ठाकरे कुटुंबाचा ताबा कायम असल्याचे दाखवण्याचे हे कारस्थान आहे. पाहा, लाखो शिवसैनिकांची माझ्यावर, म्हणजेच ठाकरे कुटुंबावर व्यक्तिगत निष्ठा आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आमचा, म्हणजे माझाच आहे. खरी शिवसेना ठाकरेंचीच ! सर्वार्थाने निरर्थक ठरणारा हा मसुदा हेच सुचवत आहे की, उद्धव ठाकरे (नंतर आदित्य ठाकरे) हेच कायम पक्षप्रमुख राहणार. दुसऱ्या शिवसैनिकाला काही संधीच नाही. त्यांनी फक्त वडापाव खायचा ! शिवसेना म्हणजे ठाकरे एके ठाकरे. बस्स ! हे सरळसरळ लोकशाहीच्या विरोधातील कृत्य आहे, हा संविधानविरोधी पवित्रा आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेणारा हा ‘गुलामगिरीचा दस्तैवज’ स्वीकारायचा की नाही, हे शिवसैनिकांनी ठरवायचे आहे.