विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीने महापालिका ग्रंथोत्सवाचा प्रारंभ

39

पिंपरी दि. १६ (पीसीबी)- भारत माता कि जय ! वंदे मातरम ! इन्कलाब जिंदाबाद ! असा जयघोष करत हातात भारतीय संविधान, संत साहित्य आणि विविध पुस्तके घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीने करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या जयघोषाने परिसर देशभक्तीच्या वातावरणाने आनंदून गेला. पिंपरी ते फुगेवाडी ते पिंपरी असा मेट्रो प्रवासामध्ये देशभक्तीपर घोषणांचा आणि मराठी साहित्याचा जागर ग्रंथ दिंडीमधून करण्यात आला.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीपासून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली. या दिंडीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ तसेच महापालिका शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राजन लाखे, संतपीठाच्या संचालिका स्वाती मुळे, राजू महाराज ढोरे, शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षक राजेंद्र कांगुडे, अनिता जोशी, महा मेट्रोचे अधिकारी मनोजकुमार डॅनिअल, ज्ञानगंगा प्रकाशनचे उमेश पाटील आदी या ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी झाले होते.

दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं.जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगत सिंग आदी महापुरुष, स्वातंत्र्य सेनानी तसेच महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारी पारंपरिक वेशभूषा साकारली होती. भारतीय संविधान तसेच संत साहित्य पालखीमध्ये ठेवून मनपा मुख्यालय येथून विविध घोषवाक्य व संतांचे अभंग गात ग्रंथ दिंडीचा प्रवास हातामध्ये भारतीय राष्ट्रध्वज आणि साहित्य वाचनाचे आवाहन करणारे फलक घेऊन सुरु झाला. वाचन केल्याने मिळते ज्ञान, दूर पळते आपले अज्ञान ! पुस्तक वाचा, ज्ञान वेचा ! वाचन म्हणजे प्रगतीचे लक्षण ! जिथे पुस्तकांचा साठा, समृद्धीचा नाही तोटा ! पुस्तकांशी करता मैत्री, ज्ञानाची मिळते खात्री ! अशा विविध घोषवाक्यांचे फलक ग्रंथ दिंडीमध्ये लक्ष वेधून घेत होते. मेट्रो प्रवासानंतर चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ग्रंथ दिंडीचा समारोप झाला.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलादालनामध्ये विभाजन विभिषिका स्मरण दिनानिमित्त चित्रप्रदर्शनाचे आयोजन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील आणि आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. देशाच्या फाळणीच्या घटनांचे निवडक माहितीपर चित्रांचे प्रदर्शन या ठिकाणी नागरिकांसाठी 21 ऑगस्ट 2022 पर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाला दिवसभरात 500 पेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली.

महापालिका आणि ज्ञानगंगा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आज पासून नागरिकांसाठी 21 ऑगस्ट 2022 पर्यंत साहित्य अमृत ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच विविध व्याख्यात्यांचा सहभाग असलेली व्याख्यानमाला देखील येथे संपन्न होणार आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील आणि आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथोत्सावातील पुस्तक प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी तसेच व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याठिकाणी नागरिकांना सवलतीच्या दरांमध्ये पुस्तके खरेदीसाठी उपलब्ध आहेत असे ज्ञानगंगा प्रकाशनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.