रोमान्स, ऍक्शन अन् कॉमेडीचा तडका असलेला ‘टीडीएम’ प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने पाहावाच असा आहे!

0
238

पैसावसूल! भाऊरावांचा ‘टीडीएम’ झालाय रिलीज, प्रत्येक तरुणाने पाहावा असा आहे सिनेमा

पुणे – मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ प्रमाणेच वेगळ्या विषयाला वाहिलेला भाऊरावांचा ‘टीडीएम’ महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाच्या मनाला साद घालतो. पहिल्या सीनपासून ते शेवटच्या सीनपर्यंत स्क्रिनपुढून नजरही हटणार नाही, असे नजर खिळवणारे चित्रीकरण ‘टीडीएम’मध्ये पाहायला मिळते. मात्र ‘टीडीएम’चा शेवट पाहून सिनेमाचा पार्ट २ येईल की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

‘ख्वाडा’ आणि ‘बबन’प्रमाणे ‘टीडीएम’मध्येही गावचा रांगडेपणा कुटून कुटून भरलेला आहे. गावाकडची नेत्रदीपक पहाट अन् त्याच्या सोबतीला पिंगळा या ‘टीडीएम’मधील पहिल्याच सीनने प्रत्येक प्रेक्षक मंत्रमुग्ध होतो. शेतातील कामांव्यतिरिक्त विहीर खोदणे, नदीतील वाळू काढणे अशी छोटीमोठी कामे करून आपले पोट भागवणाऱ्या गावकऱ्यांचे जीवन व सोबतीला गावच्या पातळीवर चालणारे राजकारण ‘टीडीएम’मध्ये दाखवण्यात आले आहे. याबरोबरच अभिनेता पृथ्वीराज थोरात (सिनेमातील पात्र- बाबू) आणि अभिनेत्री कालिंदी निस्ताने (सिनेमाती पात्र- नीलम) यांची खट्टी-मिठी प्रेमकहानी सिनेमाला आणखी रंगत चढवते. रोमान्सबरोबरच  कॉमेडी आणि ऍक्शनचा तडाखा प्रेक्षकांना खळखळून हसवायला आणि शिट्ट्या वाजवायला भाग पाडतो. 

‘टीडीएम’मधील डायलॉग्जही अत्यंत प्रभावी आहेत. तसेच भाऊरावांच्या मागील दोन सिनेमांप्रमाणे ‘टीडीएम’मधील गाणीही संगीतप्रेमींना आपलंसं करतील अशी आहेत. एक फूल, मन झालं मल्हारी गाण्यांनी मनात प्रेमाची लहर उठते तर बकुळा गाणं पाहून डोळ्यातून आपोआप अश्रू ओघळू लागतात. पण ‘टीडीएम’मधील खरा ट्विस्ट तर सिनेमाच्या शेवटी आहे. शेवटी बाबूला नीलमचे प्रेम तर मिळतेच, पण बाबू मोठा बिझनेसमन कसा बनतो?, याची कहानी मात्र दिग्दर्शक भाऊरावांनी अपुरी ठेवली आहे. त्यामुळे ‘टीडीएम’च्या पुढील पार्टमध्येच बाबूला यशाची किल्ली कशी सापडली?, या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना मिळेल असं वाटतंय.