रिव्हर रेसिडन्सी सोसायटीत अकराव्या मजल्यावरून उडी घेत उच्चशिक्षित तरुणाने उचलले धक्कादायक पाऊल

0
297

चिखली, दि. १८ (पीसीबी) – ‘चांगल्या पगाराची नोकरी आणि सर्व सुखसुविधा असताना माझं मन त्यात लागत नाही’ असं डायरीत लिहीत उच्चशिक्षित तरुणाने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. विरेण जाधव (२७) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील चिखली येथे असलेल्या रिव्हर रेसिडेन्सी येथे तो राहण्यास होता. नोकरी चांगली आहे मात्र माझं मन त्यात लागत नाही असा उल्लेख त्याने त्याच्या डायरीत केला आहे अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व सुखसोयी असताना आयुष्यात आलेल्या नैराश्यामुळे सत्तावीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास उजेडात आली. विरेण हा आई वडिलांसह चिखलीतील रिव्हर रेसिडेन्सीत राहण्यास होता. तो नामांकीत कंपनीत नोकरी करत होता, चांगला पगार असताना आयुष्यात आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे अशी माहिती प्राथमिक तपासानंतर चिखली पोलिसांनी दिली आहे.

विरेण त्याच्या आयुष्यात का? नैराश्यात होता हे त्याने त्याचे डायरीत लिहून ठेवले आहे. नोकरी चांगली असली तरी त्यात आनंद मिळत नाही असे काही मुद्दे त्याने लिहिलेले आहेत. त्याच्या जाण्याने त्याच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आणखी काही वेगळं कारण आत्महत्येमागे असू शकतं का याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.