राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीलाही दांडी

0
380

पिंपरी दि. २६ (पीसीबी) -मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे पक्षापासून फटकून राहत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. सातत्याने ते पक्षाच्या बैठकीला दांडी मारतात. त्याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काळेवाडी येथे झालेल्या सभासद आढावा बैठकीकडेही आमदार बनसोडे यांनी पाठ फिरवली. त्यामुळे बनसोडे पक्षावर नाराज आहेत की पक्ष त्यांना सोडचिठ्ठी देणार ? याची जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. या पूर्वी अजित पवार यांच्या बैठकीलाही तब्येत ठिक नसल्याचे कारण देत ते अनुपस्थितीत होते.

जयंत पाटील यांच्या उपस्थित काळेवाडीत झालेल्या बैठकीला शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, महिलांच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आदी प्रमुख पदाधिकारी आदी उपस्थित होते.

शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळाला नव्हता. अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची वेळ पक्षावर आली होती. पिंपरीत उमेदवार बदलून अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली. बनसोडे निवडून आले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना बनसोडे हे पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत होते. पण, जून मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी उशिराने केलेले मतदान, नवीन सरकारचा विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीतही आमदार बनसोडे गैरहजर होते. तेव्हापासून बनसोडे हे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत 6 ऑगस्ट 2022 रोजी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याकडेही ते फिरकले नाहीत. दोन दिवसांपूर्वी निगडीतील सर्वपक्षीय माजी नगरसेवकांसह महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतलेल्या आमदार बनसोडे यांनी आज पुन्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या सभासद आढावा बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे बनसोडे पक्षावर नाराज आहेत की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यायची अशी चर्चा सुरू आहे.

आमदार बनसोडे यांच्या अनुपस्थितीबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, “त्यांना एका ठिकाणी जायचे होते. माझ्या पूर्वपरवानगीने गेले आहेत. सायंकाळी आमची भेट होईल असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली”.