रात्रप्रशालेत गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ उत्साहात संपन्न.

284

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – पूना नाईट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या १०२ व्या वर्धापनदिनी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरस्वती मंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर यांनी केले. रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक मा. महेश पालकर प्रमुख पाहुणे म्हणून तर शाला समिती अध्यक्ष मा. अविनाश नाईक व प्राचार्य सतीश वाघमारे उपस्थित होते.

प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचा सार उलघडल्यानंतर कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत गेला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. पालकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये जर आत्मविश्वास व या आत्मविश्वासाच्या जोडीला पडेल ते काम करण्याची जिद्द व चिकाटी अंगी असेल तर आयुष्यात तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही व याच्या जोरावर तुम्ही नक्कीच यशाला गवसणी घालू शकाल असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केला. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना मा. नाईक म्हणाले की, कठोर परिश्रम ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे त्यामुळे या गुरुकिल्लीचा वापर करून पुढील आयुष्यात असेच घवघवीत यश संपादन करा. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रतिनिधिक स्वरूपात कु. कोमल किरवे, चि. परशुराम पवार व श्रीमती संगीता शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्याला रात्र प्रशालेत शिक्षण घेताना शासनाच्या काही चुकीच्या धोरणांमुळे काही अडचणींना सामोरे जावे लागले त्या अडचणींना भविष्यात इतर विद्यार्थ्यांना सामोरे जाऊ लागू नये अशी खंत त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. अधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रात्र प्रशालेचे कामकाज दर्शविणारी चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली.

काव्यांच्या ओघवत्या शैलीत प्राचार्य वाघमारे यांनी आभार प्रदर्शनाची कामगिरी पार पाडत संपूर्ण वातावरण काव्यमय करून टाकले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुबाळकर यांनी तर कार्यक्रमाचे संयोजन रात्र प्रशालेच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या केले.