राज्यसभेचे मतदान कसे होणार – आमदार लक्ष्मण जगताप मतदानाला जाणार का ?

158

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण सात उमेदवार रिंगणात असल्याने कोण बाजी मारेल याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. भाजप व शिवसेनेने अपक्ष व छोट्या पक्षांच्या २९ आमदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. २८८ आमदारांच्या सभागृहात २८७ सदस्य आहेत. भाजपाचे १०६, शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादी ५३, काँग्रेस ४४ आणि छोट्या पक्षांचे २९ असे संख्याबळ आहे. पोलिस कोठडित असलेले राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही, तर भाजपाचे लक्ष्मण जगताप प्रकृती ठिक नसल्याने उपस्थित राहू शकत नाहीत. शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाले आहे. आता अपक्ष आमदारांना त्यांचे मतदान दाखविण्याची गरज नाही, असा निर्णय न्यायालयाने दिल्याने गूढ वाढले आहे. महाविकास आघाडी किंवा भाजपची मते फुटणार का, अपक्ष किंवा छोट्या पक्षांचे आमदार पाठिंबा दिलेल्या पक्षांबरोबर ठाम राहणार का, असे असंख्य प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

आमदारांची फाटाफूट किंवा मतदानाला आमदारांनी उपस्थित राहावे यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीने आपापल्या आमदारांना सुरक्षित स्थळी म्हणून पंचतारांकित हॉटेलात ठेवले आहे. अनिल देशमुख व नवाब मलिक या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची मते कमी झाल्याने आता महाविकास आघाडीचे गणित बिघडले आहे. समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी महाआघाडीला मत द्यायचे जाहीर केले आहे. मनसेच्या एका आमदाराचे मत भाजपाला जाणार आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे तीन तर एमआयएमचे दोन आमदार कोणती भूमिका घेतात यावरही महाविकास आघाडी आणि भाजपचे भवितव्य ठरणार आहे. 

राज्यसभा निवडणुकीत मतदान कसे होते?
विधानसभेच्या आमदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करता येते. राजकीय पक्षाकडून पक्षादेश लागू केला जातो. त्यात कोणत्या आमदाराने पहिल्या पसंतीचे मत कोणाला, दुसऱ्या पसंतीचे मत कोणाला द्यायचे हे निश्चित केले जाते. यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवून मतदान करावे लागते. अपक्षांना मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नाही. राजकीय पक्षाच्या आमदारांनी मतदान करताना मतपत्रिका अन्य पक्षाच्या प्रतिनिधीला दाखविली तरी मतपत्रिका बाद केली जाते. उमेदवारांच्या नावासमोर आमदारांनी पसंतीक्रम लिहायाचा असतो.
मतदान प्रक्रिया कशी असते?
प्रत्येक मताचे मूल्य हे शेकड्यात गणले जाते. म्हणजे ४२ मतांचा कोटा असला तर मतांचे मूल्य हे ४२०० असते. एकूण मतदान किती होते यावर पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित केला जातो. सध्या विधानसभेची सदस्यसंख्या २८७ आहे (एक जागा रिक्त). त्या आधारे पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे विजयाकरिता ४१.०१ मतांची आवश्यकता असेल. म्हणजेच ४१०१ मते मिळविणारा पहिल्या फेरीत विजयी होऊ शकतो.

दुसऱ्या पसंतीची मते कशी हस्तांतरित होतात?
मतांचा कोटा निश्चित झाल्यावर तेवढी मते मिळविणारा पहिल्या फेरीत विजयी होतो. ४१०१ मतांचा कोटा असला आणि एखाद्या उमेदवाराला ४४०० मते मिळाली तर त्याच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. त्यानुसार ४४०० मते मिळालेल्या उमेदवाराकडे अतिरिक्त २९९ मते असतील. ही सर्व २९९ मते हस्तांतरित होत नाहीत. या मतांचे मूल्य निश्चित केले जाते. उदा. ४४ मते मिळालेल्या उमेदवाराची सर्व दुसऱ्या पसंतीची मते एखाद्या उमेदवाराला हस्तांतरित झाली असल्यास त्याचे मूल्य काढले जाते. समजा ३५ मतेच हस्तांतरित झाली असल्यास त्या आधारे मतांचे मूल्य काढला जाते. २९९ भागीले ४४ या आधारे येणारी संख्या ६.७९ येते. मताचे मूल्य ठरविताना पूर्णांक बिंदूवरील संख्या गृहित धरली जात नाही. म्हणजेच सहा एवढे मूल्य असेल. हस्तांतरित झालेली मते ४४ व भागाकार केल्यावर आलेले मतांचे मूल्य ६ याला गुणले जाते. ४४ गुणिले सहा २६४ मते त्यात वाढतात. एखाद्या उमेदवाराला पहिल्या फेरीत ३६०० मते मिळाली असल्यास त्याच्या मतांमध्ये २६४ मतांची भर पडते. म्हणजे त्याच्या मतांचे मूल्य ३८६४ होते. ४१०१ मतांचा कोटा पूर्ण करेपर्यंत तो उमेदवार निवडून येत नाही.

कोणाला धोका आहे?
शिवसेना आणि भाजपकडे अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्याकरिता पुरेशी मते नाहीत. शिवसेनेचे ५५ आमदार असून, पक्षाकडे १३ मते अतिरिक्त आहेत. ५३ आमदार असलेल्या राष्ट्रवादीकडे ११ मते अतिरिक्त आहेत. अपक्ष किंवा छोट्या पक्षांवर महाविकास आघाडी किंवा भाजपची सारी मदार आहे. भाजपला काहीही करून तिसरी जागा निवडून आणायची आहे. कारण महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाल्यास भाजपला महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक होण्यास संधीच मिळेल. महाविकास आघाडीने तीन पक्षांच्या आमदारांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले. कागदावर तरी महाविकास आघाडी प्रबळ वाटत असली तरी प्रत्यक्ष मतदान कसे होते यावर भाजप वा शिवसेना उमेदाराचे भवितव्य अवलंबून आहे.