रमजानच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 78 लोकांचा मृत्यू

0
174

दुबई, दि. २० (पीसीबी) – येमेनची राजधानी साना येथे रमजानच्या एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 78 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओत बब-अल येमेन भागात प्रचंड गोंधळ माजल्याचं दिसून येतं.रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार एका शाळेत प्रत्येक व्यक्तीला 700 रुपये दान म्हणून मिळणार होते. त्यावेळी अनेक लोक एकत्र आले आणि ही घटना घडली.

हैथी बंडखोरांतर्फे 2015 मध्ये सरकार उलथवल्यानंतर ही शाळा चालवली जात होती. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या लोकांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.या घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यापैकी 13 लोकांची प्रकृती गंभीर आहे, असं साना येथील आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं. AP या वृत्तसंस्थेन दिलेल्या दोन प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने माहिती दिली की हैथी बंडखोरांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हवेत गोळीबार केला. ती गोळी एका इलेक्ट्रिक वायरला लागली आणि त्यामुळे स्फोट झाला आणि गोंधळ उडाला. रमजानच्या शेवटच्या दिवसांमध्ये ही घटना घडली आहे.

2015 झालेल्या संघर्षानंतर येमेनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हैथी बंडखोरांनी देशाच्या पश्चिम भागावर नियंत्रण मिळवलं होतं. राष्ट्राध्यक्ष अब्द्राबुह मनसौर हादी परदेशात पळून गेले आणि सौदी अरेबियाने हस्तक्षेप केला आणि त्यांचं राज्य रुळावर आणलं. त्यानंतर अनेक वर्ष सैनिकी उठाव झाले. या संघर्षात एकूण 150,000 लोकांचा मृत्यू झाला आणि 2.3 कोटी लोकांना मदतीची गरज आहे.