माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराने निधन

305

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) : माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवार (ता.२६) रोजी निधन झाले. निम्हण हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.दोन वेळा ते कोथरूड मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. तर कोथरूड मतदार संघाचे विभाजन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी शिवाजीनगर मतदारसंघात देखील आमदारकी भूषविली होती.निम्हण हे राजकारणामधील एक बडे प्रस्थ होते.

सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन मोठे करण्याची त्यांची खुबी होती. निम्हण यानी शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात करून आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर आमदारकी पर्यंत पोहोचले होते. विनायक निम्हण हे कोथरूड मतदारसंघातून दोन वेळेस (१९९९ ते २००९) शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. नंतर त्यानी नारायण राणे यांच्या बरोबर काँग्रेस पक्षात प्रवेश करुन शिवाजीनगर मतदार संघामध्ये (२००९ ते १०१४) काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निडून आले होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी माजी नगरसेविका स्वाती निम्हण,मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण व दोन मुली असा परिवार आहे.

शिवसेनेचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती होती. पुणे शहरप्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ कामकाज पाहिले. निम्हण यांचे शिवाजीनगर, पाषाण, कोथरूड परिसरात मोठे वर्चस्व होते. सूस येथील सनी वर्ल्ड या अत्यंत प्रशस्त पर्यटन केंद्राची उभारणी त्यांनीच केली.