माघार घेतल्याचं वृत्त खोटं ? साक्षी मलिकचा खळबळजनक खुलासा…

0
196

नवी दिल्ली,दि.०५(पीसीबी) – कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार यांच्याविरोधात कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट आंदोलन करत होते. पण, साक्षी मलिकने आंदोलनातून माघार घेतली असल्याचं वृत्त पसरलं होतं. पण, साक्षी मलिकने यावर खुलासा केला आहे. दिल्ली भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशाली पोतदार यांनी साक्षी मलिकने आंदोलनातून माघार घेतलं असल्याचं ट्वीट केलं होतं. त्या म्हणाल्या की, “कुस्तीपटूंच्या आंदोलनातून साक्षी मलिकने माघार घेतली आहे. ती पुन्हा रेल्वेच्या कामावर रुजू होणार आहे.”

विविध वृत्तमाध्यमांनीही साक्षीने आंदोलनातून माघार घेतली असल्याचं वृत्त चालवलं होतं. आता साक्षीने ट्वीट करत खुलासा केला आहे. तिने म्हटलं की, “हे वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे. न्यायासाठीच्या लढाईत आमच्यातील कोणी मागे हटले नाही आणि हटणारही नाही. आंदोलनाबरोबर मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल. कृपया चुकीचे वृत्त पसरवू नका.”

“आम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. तेव्हा त्यांना ( ब्रिजभूषण सिंग ) अटक करण्याची मागणी केली आहे. आम्ही आंदोलनातून माघार घेतली नाही. मी रेल्वेच्या कामावर रुजू होणार आहे. न्याय मिळेपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. मुलीने एफआयआर मागे घेतल्याचं वृत्त चुकीचं आहे,” असं साक्षी मलिकने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

बजरंग पुनियानेही ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. “आंदोलनातून माघार घेत असल्याचे वृत्त अफवा आहे. आम्हाला नुकसान पोहचवण्यासाठी वृत्त पसरवलं जात आहे. आम्ही ना माघार घेतली आहे, ना आंदोलन मागे घेतलं आहे. महिला कुस्तीपटूने एफआयआर मागे घेतल्याचं वृत्तही खोटे आहे. न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार,” असं बजरंग पुनियाने म्हटलं आहे.