मला आणि माझ्या परिवाराला सर्वजण मिळून एकटं पाडतील

0
138

बारामती, दि. १६ (पीसीबी) – आगामी निवडणुकीत मला आणि माझ्या परिवाराला सर्वजण मिळून एकटं पाडतील. माझ्या विरोधात सर्वजण प्रचार करतील. आपण आपल्या परीने काहींना विनंती करू. तेवढं करूनही काही जिवाचं रान करून सगळे मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतील. पण, बारामतीची जनता माझ्यासोबत असणार याची मला खात्री आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली.

बारामती येथील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री पवार अनेकदा भावूक झाले होते. ते म्हणाले, हे सर्वजण एकच आहेत. आपल्याला बनवत आहेत का, अशी चर्चा होते. पण तसं काही नाही. आगामी निवडणुकीत सर्वजण माझ्याविरोधात एक होतील, पण बारामतीची जनता माझ्या पाठीशी राहील, याची मला खात्री आहे.

आपल्या विरोधी पक्षाकडून तुम्हाला संपर्क साधला जात आहे. काहींना आता दिसतंय की हे आता साधं राहिलं नाही. मला लोकसभेला आणि विधानसभेला वेगळं चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला डाग लागला तर माझी राजकारणात किंमत कमी होणार आहे, असे अजित पवार यांनी सांगताच उपस्थितांमधून आम्ही तुमची किंमत कमी होऊ देणार नाही, असा आवाज आला. (Ajit Pawar Speech)

अजित पवार म्हणाले, दौंड, बारामती, इंदापूर, भोर, वेल्हे, मुळशी या ठिकाणी आपल्याला पायाभूत सुविधा उभ्या करायच्या आहेत. तेवढी आपली ताकद आहे, तेवढा आपला आवाका आहे. आपण वरवरचं राजकारण करत नाही. नुसतं सेल्फी काढत आपण फिरत नाही. आपण कामच करून दाखवतो.
काळुराम चौधरी यांची हयातच मला विरोध करण्यात गेली. त्यांनी सांगितलं की, मला कॉन्ट्रॅक्टर लागतात, पण मला काम करून घ्यायला कॉन्ट्रॅक्टर लागतात. दुसऱ्या कोणत्या गोष्टीला मला कॉन्ट्रॅक्टर लागत नाहीत. ज्यांना कॉन्ट्रॅक्टर लागतात, ते घरी बोलावून घेतात आणि फिक्सिंग करून टाकतात. मी लोकांसमोर कॉन्ट्रक्टॅरला नेतो आणि काम पाहतो. या सर्वांचा विचार जनतेने केला पाहिजे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.