भोसरी रुग्णालयातील प्रसूतीकक्ष, प्रसूती शस्त्रक्रिया विभागाला ‘एनक्युएस’ गुणवत्ता प्रमाणपत्र

0
456

भोसरी,दि.०३(पीसीबी) – मातामृत्यु आणि बालमृत्यु दर कमी करण्यासाठी प्रसूतीकक्ष व शस्त्रक्रिया विभागामधील गुणवत्ता वाढ तसेच मातांना सुरक्षित प्रसुती आणि मातृत्वाचा आनंद घेता यावा यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधांच्या गुणवत्तेसाठी केंद्र शासनाच्या ‘लक्ष्य’ (LaQshya) या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील प्रसूतीकक्ष आणि प्रसूती शस्त्रक्रिया विभागाला राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक (NQAS) गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

प्रसूतीचा सुरक्षित आणि आनंददायी अनुभव प्रत्येक गर्भवती महिलेला मिळावा अशी तिची आणि तिच्या कुटुंबाची इच्छा असते. यासाठी देशातील मातामृत्यु आणि बालमृत्यु दर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य आणि व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘लक्ष्य’ (Labour Room Quality Improvement Initiative) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांतील प्रसुतीकक्ष आणि प्रसूती शस्रक्रिया विभागामधील देण्यात येणाऱ्या सुविधांची गुणवत्ता सुधारावी तसेच प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर प्रत्येक स्त्रीला सन्मानपूर्वक आणि उच्च दर्जाची मातृत्व काळजी प्रदान केली जावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील प्रसुतीकक्ष व प्रसूती शस्त्रक्रिया विभागाने लक्ष्य उपक्रमांतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि एसओपी (मानक ऑपरेटिंग प्रक्रिया) नुसार राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक (एनएक्यूएएस) प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. प्रसूतीकक्ष आणि प्रसूती शस्त्रक्रिया विभागामध्ये दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची गुणवत्ता अधिक आहे. येथे प्रत्येक माता आणि तिच्या नवजात बालकांची सर्वोत्तम पद्धतीने योग्य आणि आदरयुक्त काळजी घेण्यात येते. मातांसाठी प्रसूतीचा अनुभव आनंददायी व्हावा यासाठी प्रसूतीकक्ष आणि शस्त्रक्रिया विभागामधील देण्यात येत असलेली सेवा अधिक गुणवत्तापूर्ण आहे. प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर प्रत्येक स्त्रीच्या मातृत्वाचा काळजीपूर्वक सन्मान केला जातो. त्यामुळे भोसरी रुग्णालयाने केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘लक्ष्य’ (LaQshya) या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक (एनएक्यूएएस) गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक (एनएक्यूएएस) गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील आणि भोसरी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. यामध्ये ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना गडलिंगकर, डॉ. चैताली इंगळे, डॉ. सुजाता गायकवाड, डॉ. अर्चना गांधी, डॉ. विकल्प भोई, असिस्टंट मेट्रन वत्सला वाझे, अनुपम वेल्हे यांचा समावेश आहे.

महापालिकेच्या वतीने विविध विकासात्मक प्रकल्पांसह वैद्यकीय सुविधा निर्माण केल्या जात आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये महापालिकेच्या वतीने नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, आकुर्डी रुग्णालयांसारखी नवीन रुग्णालये उभारण्यात आली असून ती २४x७ कालावधीत अद्ययावत सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. महापालिका क्षेत्रातील किडनीच्या आजारांनी त्रस्त गरजू आणि गरीब रुग्णांकरिता नवीन थेरगाव रुग्णालय येथे डायलेसीस केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी शिशु अतिदक्षता विभाग देखील सुरु करण्यात येणार असून गरजू तसेच रुग्णालयात जन्मलेल्या आणि अतिदक्षता विभागातील आवश्यकता असलेल्या नवजात शिशूंना रुग्णालयातच उपचार मिळावेत यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. शहर अॅनिमिया मुक्त करण्यासाठी महापालिकेने सुरु केलेली ‘मिशन अक्षय’ योजना अतिशय परिणामकारक ठरत आहे.

तसेच महापालिकेच्या वतीने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानांतर्गत १८ वर्षे वयोगटावरील सर्व महिला, माता, गरोदर महिला यांची सर्वांगीण तपासणी करण्यात आली. त्यांना प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या कालावधीमध्ये सर्व महिला, माता, गरोदर महिलांना महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये येथे सोनोग्राफी, एक्स-रे, सेवा, समुपदेशन, औषधोपचार आदी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. या अभियानाला शहरातील महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देखील दिला आहे.