“इतक्या” मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी अग्निशामक परवान्याची गरज नाही

0
274

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील 15 ते 24 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेताना अग्निशामकचा दाखला घेण्याची आवश्यकता नाही. केवळ बेसिक नॉन स्ट्रक्चरल फायर सेफ्टी मेजरची पूर्तता केल्याची खात्री करुन पूर्णत्वाचा दाखला देण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहर अभियंता मकरंद निकम यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

राज्य शासनाने 2020 मध्ये एकत्रित विकास नियंत्रण नियमावली लागू केली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका समाविष्ट समावेश आहे. त्यानुसार 24 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना अग्निशामक विभागाचा ना-हरकत दाखला आवश्यक नव्हता. त्याप्रमाणे बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. तथापि, पुणे महापालिका अग्निशामक विभागाप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक विभागाने देखील पूर्वीप्रमाणेच 15 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या निवासीसह सर्व प्रकारच्या इमारती, 500 चौरस मीटर पेक्षा अधिक क्षेत्रफळाचा मजला (स्लॅब) आहे. अशा विविध मिश्र, वाणिज्य इमारतींना तात्पुरता, सुधारीत आणि अंतिम अग्निशाक ना-हरकत दाखला देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने बांधकाम परवानगी विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.

महापालिका हद्दीतील 15 ते 24 मीटर पर्यंत उंची असलेल्या प्रकल्पांना बांधकाम विभागामार्फत देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीनुसार जागेवर बांधकाम पूर्ण झालेले असेल. तर, अग्निशामक विभागाच्या नियमानुसार भूमिगत, छतावरील पाण्याची टाकी आणि इतर फायरची प्रोव्हिजन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अशा इमारतींना पूर्णत्वाचा दाखला देण्याबाबत धोरण ठरविणे आवश्यक होते. आयुक्त शेखर सिंह यांच्या 10 ऑक्टोबर 2022 च्या प्रस्तावानुसार अशा इमारतींना बेसिक नॉन स्ट्रक्चरल फायर सेफ्टी मेजर घेवून पूर्णत्वाचा दाखला देण्यास मान्यता दिलेली आहे.

त्यामुळे अग्मिशामकचा आदेश येण्यापूर्वी 15 ते 24 मीटर उंचीपर्यंतच्या ज्या इमारतींना बांधकाम परवानगी दिलेली असेल. त्याप्रमाणे बांधकाम पूर्ण झालेले असेल अशा प्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला देताना अग्निशामकचा दाखला घेण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी बेसिक नॉन स्ट्रक्चरल फायर सेफ्टी मेजरची पूर्तता केल्याची खात्री करुन पूर्णत्वाचा दाखला नागरिकांना मिळणार आहे.