बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणा-या ‘फॉरमायका’ला दणका; 45 लाखांचा दंड वसूल

41

पिंपरी दि ४ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणा-या आकुर्डी येथील मे. फॉरमायका कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा दणका दिला आहे. एका वृक्षाकरीता 50 हजार रूपये प्रमाणे एकूण 90 वृक्षासाठी 45 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अमलात आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील कोणत्याही वृक्षांचा विस्तार कमी करणे, वृक्षतोड करणे, वृक्ष पुनर्रोपन करणे पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. मात्र, आकुर्डीतील मे फॉरमायका कंपनीने अनधिकृतपणे वृक्ष काढलेली आहेत. या जागेवर वृक्ष गणनेच्या माहितीच्या आधारे असलेले वेगवेगळया प्रजातीचे एकूण 90 वृक्ष जे. सी. बी च्या सहाय्याने वृक्ष काढल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते.

विनापरवाना वृक्ष काढल्यामुळे प्रत्येकी एका वृक्षाकरीता 50 हजार रूपये प्रमाणे एकूण 90 वृक्षासाठी 45 लाख रूपयांचा दंडाची नोटीस महापालिकेने फॉरमायका कंपनीला पाठविली होती. यानुसार कंपनीकडून 90 झाडे विनापरावाना काढल्याप्रकरणी 45 लाख रुपयांचा दंड 28 जुलै 2022 रोजी वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन झाडे विनापरवाना काढणा-या प्रभाकर न्यालकंठी यांच्याकडून 1 लाख रुपये दंड वसूल केला आहे.