बांधकाम मजूर असलेली वर्षा बुमरा बनली डीआयडी ची `सुपरमॉम“

125

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – टीव्ही मनोरंजन विश्वात लोकप्रिय असणाऱ्या डीआयडी अर्थात डान्स इंडिया सुपर मॉमच्या स्पर्धेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आता या स्पर्धेमध्ये हरियाणाच्या वर्षानं विजेतेपद पटकावलं आहे. वर्षा बुमरा असे तिचे पूर्ण नाव असून ती घरकाम आणि मजुरी करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करते. वर्षा जिंकल्यानंतर तिच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या काही दिवसांपासून डान्स इंडिया डान्स सुपर मॉमची चर्चा होती. त्यात कोण विजयी होणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता होती.

वर्षा विजयी झाल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. एका गरीब कुटूंबातून आलेल्या वर्षाच्या संघर्षाचं सोशल मीडियावर देखील कौतूक होतंय. एवढेच नव्हे तर तिच्या विजयी झाल्याचा आनंद गावकऱ्यांनी देखील साजरा केला आहे. कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्हाला हवं ते मिळाल्यावाचून राहत नाही याचा प्रत्यय वर्षाकडे पाहिल्यावर येतो. डान्स इंडियाच्या शोमध्ये तिनं केलेल्या परफॉर्मन्सनं नेटकऱ्यांची पसंती मिळवली होती. वर्षा विजयी होणार यावर तिच्या चाहत्यांनी शिक्कामोर्तब केलं होतं.