बस ५० फूट खोल दरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

0
100

छत्तीसगड, दि. १० (पीसीबी)- छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. दुर्ग जिल्ह्यातील कुम्हारी येथे बस ५० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मंगळवारी रात्री ड्युटीवरून परतत असताना कर्मचाऱ्यांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

दुर्ग जिल्ह्यातील केडिया डिस्टिलरीच्या सुमारे ४० कर्मचाऱ्यांना घेऊन कुम्हारीहून भिलाईला परतणारी बस मंगळवारी रात्री ९ वाजता ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्ग जिल्हाधिकारी ऋचा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

कंपनीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याचे आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे. या अपघातात जखमी झालेल्या १० जणांना रायपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ६ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ड्युटीवरून परतत असताना खापरी रोडवरील पारा खाणीच्या मुरूम खाणीत बस कोसळली. एसपी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सीएसपी छावणी, सीएसपी भिलाई नगर घटनास्थळी हजर आहेत. अपघात कसा घडला याचा तपास सुरू आहे, जखमींना प्राधान्याने उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.