पाकिस्तानात हिंदू डॉक्टरची गळा चिरुन हत्या

175

कराची, दि. ९ (पीसीबी) – पाकिस्तानात हिंदू डॉक्टराची हत्या करण्यात आली आहे. चालकानेच डॉक्टराची गळा चिरुन हत्या केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या हैदराबाद येथे ही घटना घडली आहे. धरम देव राठी असं या डॉक्टराचं नाव असून त्वचारोग तज्ज्ञ होते. हनीफ लगहरी असं या चालकाचं नाव असून पोलिसांनी हत्येच्या दुसऱ्या दिवशी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने घरामध्येच चाकूने धरम देव राठी यांचा गळा चिरुन ठार केलं.

पोलिसांनी आरोपी हनीफला खैरपूर येथून बुधवारी अटक केली आहे. आरोपीची ओळख पटली असून हनीफ असं त्याचं नवा आहे. घरातील आचाऱ्याने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घऱी येत असताना दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. घरी पोहोचल्यानंतर चालकाने किचनमधून चाकू घेतला आणि डॉक्टर धरम देव राठी यांची घरातच गळा चिरुन हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. होळी खेळण्यावरुन हा वाद झाल्याचं वृत्त काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

द नेशनच्या वृत्तानुसार, डॉक्टर धरम देव राठी हे हैदराबादमधील प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ होते. पाकिस्तानचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री ग्यानचंद इसरानी यांनी पोलिसांचं 24 तासात आरोपीला अटक केल्याने कौतुक केलं आहे. तसंच डॉक्टरांच्या कुटुंबाला न्याय दिला जाईल असं आश्वासन दिलं आहे.

पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या महिला विंगच्या प्रमुख फरयाल तलपूर यांनी या हत्येचा निषेध केला असून ही घटना मन विषण्ण करणारी असल्याचं म्हटलं आहे. तसंच न्याय केला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. हिंदू समाज एकीकडे होळी साजरी करत असताना दुसरीकडे अशाप्रकारे हत्या होणं दु:खद असल्याचं म्हटलं आहे.