पत्नीच्या मित्राचा खून, दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून

313

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – पत्नीचा मित्र तिला भेटण्यासाठी आला असता पतीने त्याच्याशी वाद घालून त्याला शस्त्राने भोकसले. त्यानंतर त्याला दहाव्या मजल्यावरून खाली ढकलून देत त्याचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री मोशी येथे घडली.

निलेश अशोक जोर्वेकर (वय 37, रा. कोल्हार, ता. राहता, जि. अहमदनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी निलेश यांचा भाऊ विजयकुमार अशोकराव जोर्वेकर (वय 40) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंकज शिंदे (वय 35, रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी आणि फिर्यादी यांचा भाऊ निलेश यांची मैत्री आहे. बुधवारी रात्री निलेश हे मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले. त्यावेळी आरोपी पंकज हा देखील घरी आला. निलेश यांना घरी पाहून त्याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन निलेश यांच्याशी वाद घातला. धारदार शस्त्राने निलेश यांच्या पोटात भोकसून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून घराच्या गॅलरीतून निलेश यांना ढकलून देऊन त्यांना ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.