चिंचवड स्टेशन येथे मोरया गोसावी आणि चापेकर बंधुंच्या स्मारकाची माहिती देणारा फलक, खासदार बारणे यांच्या हस्ते उद्घाटन

33

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील श्रीमान् महासाधू श्री मोरया गोसावी समाधी स्थळ व क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या स्मारकाची रेल्वे प्रवशांना माहिती व्हावी यासाठी चिंचवड रेल्वे स्टेशन येथे एक फलक लावण्यात आला आहे. मोरया गोसावी आणि चापेकर स्मारकाच्या दर्शनासाठी येथे उतरावे असा मजकूर या फलकावर आहे. त्याचे उद्घाटन मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज (बुधवारी) करण्यात आले.

या प्रसंगी चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभूणे, अेडीआरएम डॅा. हिरवे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, देवस्थानचे विश्वस्त विश्राम देव, चापेकर स्मारक समितीचे सहकार्यवाह रवींद्र नामदे, स्टेशन मास्तर ए.एम.नायर, नारायण लांडगे, राजू सराफ, वाठारकर काका, रवी देशपांडे, गुलामअली भालदार आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”श्रीमान् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांनी चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. त्यामुळे चिंचवड भागाला अध्यात्माचा मोठा वारसा लाभला आहे. तर, चापेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी होते. पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या चापेकर बंधुंनी वॉल्टर चार्ल्स रँडचा वध केला. चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर स्मारक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे असून राज्यासाठी आणि शहरासाठी ते भुषणास्पद ठरणारे आहे. त्याची माहिती लोकांना होणे आवश्यक आहे. रेल्वे प्रवाशांना चापेकर वाडा पाहण्यासाठी, मोरयांच्या दर्शनासाठी शहराता येताना कुठे उतरायचे याची माहिती नसते. त्यामुळे प्रवाशांनी श्रीमान् महासाधू श्री मोरया गोसावी समाधी स्थळ व क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या स्मारकाच्या दर्शनासाठी चिंचवड स्टेशन येथे उतरावे, असा फलक लावण्यात आला आहे. भविष्यात मोरया गोसावी आणि चापेकर बंधुंचे तैलचित्र चिंचवड स्टेशन येथे लावण्याचे आश्वासन” खासदार बारणे यांनी यावेळी दिले.

गिरीश प्रभुणे म्हणाले, ”श्रीमान् महासाधू श्री मोरया गोसावी समाधी स्थळ व क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या स्मारकाची रेल्वे प्रवशांना माहिती व्हावी यासाठी फलक लावण्याची खासदार बारणे यांची संकल्पना कौतुकास्पद आहे. फलकामुळे रेल्वे प्रवाशांना मंदिर, स्मारक कोठे आहे याची माहिती मिळेल. त्यामुळे लोक स्मारकाला भेट देतील. खासदार बारणे यांनी स्थायी समिती अध्यक्ष असताना चापेकर वाड्याच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्गी लावले. क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाचे टपाल तिकीट सुरु करण्याचे अनेक वर्षांपासून रखडले होते. खासदार बारणे यांनी पाठपुरावा करुन दामोदर चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीटाचे प्रकाशन केले. त्यासाठी तत्कालीन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना शहरात आणले होते. खासदार बारणे यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य लाभत आहे”.