खराळवाडी येथील तरुणीचा संशयास्पद मृत्यू

224

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरीतील खराळवाडी येथील एका तरुणीचा मंगळवारी (दि.14) रोजी रात्री येरवडा येथे एका इमारतीच्या खाली मृतदेह आढळला. या तरूणीचा घातपात झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली नढे यांनी येरवडा पोलीसांकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीतील खराळवाडी येथील एक 17 वर्षीय तरुणी मंगळवारी रात्री येरवडा येथे गेली होती. तेथे एका इमारतीच्या खाली तिचा मृतदेह आढळला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. आकस्मिक मृत्यूची नोंद करून शवविच्छेदनानंतर मृतदेह आईच्या ताब्यात देण्यात आला होता.
आज मृतदेह अंत्यसंस्कारासाठी खराळवाडी येथे आणला असता नातेवाईकांनी संबंधित तरुणीवर अत्याचार करून तिचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी करीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सायली नढे, प्रदेश सेक्रेटरी स्वाती शिंदे, काँग्रेसचे कार्यकर्ते व नातेवाईक यांनी येरवडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे पोलीसांनी यातील गुन्हेगारांना शोधण्याचे आश्वासन दिले. सध्या मृतदेह पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय ठेवण्यात आला आहे.