“आम्ही लटकत नाही” ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया

0
226

मुंबई,दि.०६(पीसीबी) – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा ६० हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे. या विजयानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नोटाला मिळालेल्या मतांवर प्रतिक्रिया देताना भाजपाची मतं ही नोटाला गेली, असे म्हटले होते. दरम्यान, यावरून भाजपा नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आधी त्यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र हातात घ्यावे, मगच टीका करावी. कुठं काय बोलावं हे त्यांना अवगत नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“आधी त्यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र हातात घ्यावं, मगच टीका करावी. कुठं काय बोलावं हे त्यांना अवगत नाही. भाजपाची मतं कोणाला पडली, यावर बोलायचं झाल्यास, आम्ही त्यांना यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. आम्ही लटकत नाही. आमचा निर्णय पक्का असतो”, असे प्रत्युत्तर नारायण राणे यांनी ऋतुजा लटके यांना दिले आहे.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मध्यावधी निवडणुका होतील, या विधानावरूनही टीका केली. “मध्यवधी निवडणुका का होतील? कारण काय आहे? नैसर्गिक आपत्ती आहे की सरकार पडलं आहे? मध्यवधी निवडणुका घ्यायचं नेमकं कारण काय आहे? उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं म्हणून मध्यावधी निवडणुका घ्यायच्या का? असं होत नाही. घरबसल्या बोलायला काय जातं. त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं”, असे ते म्हणाले.