आमदार लक्ष्मण मतदानासाठी रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना

118

पिंपरी, दि.२० (पीसीबी) : पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे पुन्हा एकदा भाजपासाठी तारणहाराची भूमिका बजावत आहेत. कारण, गंभीर आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून जाऊन राज्यसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतर आता पुन्हा एकदा ते आपल्या पक्षासाठी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यास रुग्णवाहिकेद्वारे मुंबईला रवाना झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना विजयाचं श्रेय दिलं होतं. त्यांच्या लढवय्येपणाचं अवघ्या महाराष्ट्रभर कौतुक झालं होतं.

आमदार लक्ष्मण जगताप गेल्या काही महिन्यांपासून ते गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन जून रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. राज्यसभेच्या वेळी जगताप हे मतदानासाठी जाणार का? अशा चर्चा होत्या. परंतु, त्यांच्या कुटुंबाने आणि स्वतः जगताप यांनी निर्णय घेऊन ते रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल झाले होतेपिंपरी-चिंचवडच्या उमा खापरे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे.

भाजपाच्या सर्वच उमेदवारांना एक- एक मत महत्वाचं आहे. त्यामुळंच आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुन्हा एकदा लढवय्या नेता म्हणून निर्णय घेत मुंबईत दाखल होऊन मतदान करण्याचं ठरवल्याच पाहायला मिळत आहे. जगताप हे आज रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल होतील तिथं मतदान करतील आणि पुन्हा त्यांच्या निवासस्थानी येतील. राज्यसभेला जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाचा मोठा फायदा पक्षाला झाला होता. त्यामुळं विजयी उमेदवार धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे यांनी टिळक आणि जगताप यांची स्वतः येऊन भेट घेतली व त्यांचे आभार मानले होते.